गौतम नवलखा यांच्या जामिनावर सुप्रीम कोर्टात २२ रोजी सुनावणी

gautam navlakha - SC - Maharastra Today

नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव हिंसाचार खटल्यातील आरोपी व पत्रकार गौतम नवलखा यांनी ‘डिफॉल्ट बेल’साठी (Default Bail) केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालय २२ मार्च रोजी सुनावणी करणार आहे. तपासी यंत्रणेने ठरलेल्या मुदतीत आरोपपत्र दाखल न केल्याने ‘डिफॉल्ट बेल’साठी केलेले अर्ज आधी विशेष न्यायालयाने व नंतर मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर नवलखा सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.

न्या. उदय उमेश लळित  व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठापुढे सोमवारी हे अपील आले तेव्हा राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे (National Investigation Agency-NIA) उत्तराचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ए. व्ही. राजू यांनी वेळ मागितली. नवलखा यांचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, हे अपिल केवळ कायद्याच्या मुद्द्यावर असल्याने उत्तराचे प्रतिज्ञापत्र नाही केले तरी चालू शकेल.

मात्र न्यायालयाने वेळे देण्याचे मान्य केले. नवलखा अटकेत असल्याने ‘एनआयए’ला  १९ मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र करण्यास सांगून त्यानंतर सुनावणी ठेवली गेली. पुणे पोलिसांनी नवलखा यांना औपचारिकपणे अटक करण्यापूर्वी दिल्लीच्या दंडाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार नवलखा यांना ३४ दिवस दिल्लीतील त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ‘डिफॉल्ट बेल’चा विचार करताना हे ३४ दिवस जमेस धरायचे की वगळायचे, एवढाच मुद्दा अपिलात आहे. हे ३४ दिवस जमेस धरले तर आरोपपत्र मुदतीनंतर दाखल केले असे होऊन नवलखा ‘डिफॉल्ट बेल’ला पात्र ठरू शकतात. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने नवलखा यांची ती नजरकैद बेकायदा ठरविली होती. त्यामुळे तो काळ ‘डिफॉल्ट बेल’च्या हिशेबात घरता येणार नाही, असे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने नवलखा यांची याचिका फेटाळली होती.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER