गौतम नवलाखा यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

गौतम नवला

पुणे (प्रतिनिधी) :  एल्गार आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा यांनी मंगळवारी (ता.५) येथील विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नवलाखा यांच्या अंतरिम सुरक्षेचा अवधी हा चार आठवड्यांपर्यंत वाढवून दिला होता. तर अटकपूर्व जामिनासाठी संबंधित न्यायालयासमोर जाण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याची मुदत ११ नोव्हेंबर रोजी संपत असल्याने त्यांनी हा अर्ज केला.

भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप गौतम नवलाखा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी याचिका नवलाखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाच्या निकालास नवलाखा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.