गौतम गंभीरने केली विराट कोहलीवर सडकून टीका

संजय मांजरेकरही सहमत कर्णधार बदलण्याची गरज असल्याचे मत

Virat Kohli - Gautam Gambhir

सलग पाच सामने गमावून आयपीएल 2020 (IPL 2020) मधून राॕयल चॕलेंजर्स बंगलोरचा (RCB) संघ बाद झाला आहे आणि आयपीएलमध्ये वारंवार अपयशी ठरुनही विराट कोहलीने (Virat Kohli) किती दिवस कर्णधारपद स्वतःकडे कायम ठेवायचे यावर माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आरसीबीला विराट कोहलीच्या पलीकडे पाहण्याची वेळ आता आली असल्याचे गंभीरने म्हटले आहे.

गौतम गंभीर हा स्वतः दोनवेळचा आयपीएल विजेता कर्णधार आहे.इएसपीएन क्रिकइन्फोच्या टी-20 टाईम आउट कार्यक्रमात त्याने आपली ही स्पष्ट मते मांडली.

आरसीबीचा संघ 2016 मध्ये उपविजेता होता.त्यानंतर 2017 व 2019 मध्ये ते तळाला होते आणि 2018 मध्ये सहाव्या स्थानी होते. त्यानंतर आता नेट रनरेटच्या जोरावर प्ले आॕफसाठी पात्र ठरल्यावर ते सनरायजर्सविरुध्द शुक्रवारी फक्त 131 धावांचेच लक्ष्य ठेवू शकले ज्याचे रक्षण करणे अवघडच होते.

गेल्या आठ सिझनपासून म्हणून 2013 पासून कोहली आरसीबीचे नेतृत्व करतोय. या आठ सिझनमध्ये त्याचा संघ तीन वेळा प्ले आॕफमध्ये पोहोचलाय पण अद्याप एकदाही आयपीएल जिंकू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर गंभीरने म्हटलेय की, विराटने स्वतःच जबाबदारी स्विकारुन कर्णधारपद सोडायला हवे. आपणाला आरसीबीचे अधिकार असते तर आपण निश्चितपणे कर्णधार बदलला असता असे गंभीरने स्पष्टपणे सांगितले. याचे कारण तो सांगतो की जबाबदारी कुणाची हा प्रश्न येतो. आठ वर्षे यशाशिवाय…हा फार मोठा कालावधी होतो. मला दुसरा कोणताही कर्णधार दाखवा..कप्तान सोडा…खेळाडू दाखवा. त्याचे सलग एवढी वर्षे अपयश खपवून घेतले असते का? कप्तानाने जबाबदारी स्विकारायलाच हवी. मी विराटच्या विरोधात नाही पण कुठेतरी त्याने जबाबदारी स्विकारुन म्हणायला हवे की हो, हे माझे अपयश आहे. या अपयशाची जबाबदारी माझी आहे.

यासंदर्भात रवीचंद्रन अश्विनचे उदाहरण देताना गंभीर म्हणाला, आर. आश्विनचे उदाहरण घ्या. दोन वर्षात तो यश देऊ शकला नाही लगेच त्याला किंग्ज इलेव्हनने हटवले. पण आपण तशाच प्रकारे एम.एस.धोनी, रोहित शर्मा व विराट कोहलीबद्दल बोलतो का? धोनीने तीन वेळा व रोहितने चार वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले म्हणून ते कप्तानपदी कायम आहेत. रोहितने यश दिले नसते तर मला खात्री आहे की त्याला हटवले गेले असते. वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळे मापदंड असू नयेत.

जबाबदारी स्विकारण्याची प्रक्रिया वरुन सुरु झाली पाहिजे, खालून नाही. व्यवस्थापन व सपोर्ट स्टाफच्या आधी कप्तानाने जबाबदारी स्विकारायला हवी.कारण तो नेतृत्व करत असतो.म्हणून कर्णधाराला जसे श्रेय मिळते तशी त्याने टीकासुध्दा स्विकारायला हवी. आम्ही प्लेआॕफसाठी पात्र ठरलो आणि आम्ही त्यासाठी लायक होतो असे तुम्ही म्हणत राहू शकत नाही. खरं तर आरसीबी हा प्ले आॕफच्या लायकीचा संघ नव्हताच. त्यांचे शेवटचे चार पाच सामने बघितले,आणि मुंबई इंडियन्सविरुध्दचा टाय सामना जरी बघितला तरी ते सुदैवीच ठरले असे म्हणावे लागेल.

विराट अनुभवी नाही असेही नाही. भारतीय संघाचे तो नेतृत्व करतोय. तो ज्या संघासाठी खेळतो त्याचा तो कप्तान असतो. पण शेवटी तुम्हाला कामगिरी दाखवायची असते. खेळात कामगीरी करुन दाखवणेच महत्त्वाचे असते.

14 सामन्यानंतर विराट कोहली सलामीला,उतरल्याच्या निर्णयावरही गंभीरने टीका केली. तो म्हणतो की सलामीलाच खेळायचे होते तर विराटने सुरुवातीपासूनच खेळायचे होते. जिंकावेच लागणार दुसरा पर्यायच नाही अशा सामन्यात जमलेली जोडी तोडणे कितपत योग्य आहे? देवदत्त पडीक्कलचा अपवाद सोडला तर आरसीबीचा संघ फलंदाजीत पुन्हा एकदा कोहली व डीविलियर्स यांच्यावरच अवलंबून दिसला. जर एबी डीविलीयर्स फॉर्मात नसता तर आरसीबीची काय स्थिती राहिली असती? त्यानेच त्यांना दौन-तीन सामने जिंकून दिले. सांघिक कामगिरी त्यांची दिसलीच नाही. त्यामुळे यंदा प्ले आॕफ गाठले म्हणून गेल्यावर्षीपेक्षा आरसीबीने वेगळे काही केले असे मला वाटत नाही असे गंभीरने म्हटले आहे.

संजय मांजरेकर यांनीसुध्दा गंभीरच्या या मतांशी सहमती व्यक्त केली आहे,.पण नेतृत्व बदलाचा विषय हा फ्रँचाईजी मालकांचा असल्याचे त्यांनी म्हणत विराटला जबाबदार धरलेले नाही पण आरासीबीला नेतृत्व बदलाची गरज आहे हे त्यांनीसुध्दा मान्य केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER