पुण्यानंतर आता कोल्हापूर शहरात गवा

कोल्हापूर : शहरात लक्षतीर्थ वसाहतीजवळ काल शुक्रवारी रात्री तीन गव्यांचा कळप घुसला. सुतारमळा परिसरासह आयडियल कॉलनीजवळ गव्यांचा मुक्तपणे वावर असल्याने शहरवासीयांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन विभागासह अग्निशमन दलाने परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. गवे उत्तरेश्वर पेठमार्गे शहरात येणार नाही, या दृष्टीने वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तरेश्वर पेठेतील गवत मंडई ते शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गव्यांचा कळप काहींना दिसला. परिसरातील नागरिकानी ही माहिती वन विभागाला दिली. यानंतर वन विभागाचे (Forest Department) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

शहरात घुसलेले तीन गवे मध्यम वाढ झालेले आहेत. पूर्ण वाढीचा नर आणि दोन माद्या असा गव्यांचा कळप असल्याचे वन विभागाने सांगितले. हा कळप पन्हाळ्यावरून आल्याची शक्यता व्यक्त केली आहे. कळपातील दोन गवे सुतार मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पंचगंगा नदीच्या दिशेने तर एक गवा दुधाळीच्या दिशेने गेला. कळपातून वेगळा झालेला गवा भेदरून शहरात शिरणार नाही, यासाठी वन विभागाने तीन पथके केली आहेत. हा गवा शहरात येणार नाही यादृष्टीने गस्त सुरू करण्यात आली. उर्वरित दोन गव्यांचाही एका पथकाकडून शोध सुरू आहे. पंचगंगा घाट परिसरातही एक पथक तैनात ठेवले आहे. दरम्यान, गवे शहरात आल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे शिंगणापूरकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER