औद्योगिक वसाहतींमध्येही आता पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा

कोल्हापूर : औद्योगिक वसाहतींमध्येही आता पाईपलाईनद्वारे (pipelines) गॅसपुरवठा (Gas supply) केला जाणार आहे. गोकुळ शिरगाव, शिरोली एमआयडीसी व कागल पंचतारांकित एमआयडीसीतील उद्योगांना कच्चा माल वितळवण्यासाठी विजेऐवजी गॅसचा वापर केल्यास एकूण वीज बिलात 50 टक्के बचत होणार आहे.

अन्य राज्यांच्या तुलनेत औद्योगिक विजेचे दर जास्त असल्याने महाराष्ट्रातील उत्पादने तयार करण्यासाठी अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त खर्च येतो. किंमत स्पर्धेत आपली उत्पादने मागे पडतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून औद्योगिक विजेचे दर कमी करा, अशी मागणी होत आहे; पण राज्य शासनाकडून ठोस असा निर्णय झाला नाही. उद्योगांचा लाखो रुपये खर्च हा वीज बिलावरच होत आहे.

सध्या फौंड्री तसेच अन्य उद्योगांना कच्चा माल वितळवण्यासाठी फर्नेसची (भट्टी)गरज असते. या फर्नेसमध्ये कच्चा माल वितळवण्यासाठी किमान 14 ते 16 तास फर्नेस पेटता ठेवावा लागतो. सध्या हे फर्नेस इलेक्ट्रिक क्वाईलच्या माध्यमातून उष्णता निर्माण करते. फर्नेस कायम ज्वलनशील ठेवण्यासाठी सतत वीजपुरवठा सुरू ठेवावा लागतो. त्यामुळे विजेचा वापर सातत्याने होत असल्याने उद्योजकाला लाखो रुपयांच्या वीज बिलाचा भुर्दंड बसतो.

आता यातून उद्योजकांची लवकरच सुटका होणार आहे. कारण आता पाईपलाईनद्वारे नॅचरल गॅसचा पुरवठा उद्योगांना होणार आहे. या गॅसचा जसा घरगुती वापर होतो, तसेच तो उद्योगांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. फौंड्री उद्योगाकडून भट्टीसाठीच सर्वाधिक विजेचा वापर होता. हेच काम गॅस पाईपलाईनद्वारे होणार असेल तर एकूण वीजबिलात मोठी बचत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER