विश्वविजेत्या गॅरी कास्पारोव्हला मातृशोक

Klara Kasparova - Garry Kasparov

सर्वात यशस्वी बुध्दिबळपटूंपैकी एक, विश्वविजेता गॅरी कास्पारोव्ह (Garry Kasparov) , याच्या आई क्लारा कास्पारोव्हा (Klara Kasparova) यांचे वयाच्या 83 व्या वर्षी कोविड- 19 (COVID-19) मुळे 25 डिसेंबर रोजी मॉस्को येथे निधन झाले. आपल्या आईला गमावल्याचे वृत्त गॅरीने 31 रोजी व्टिटरद्वारे जाहीर केले. क्लारा यांनी निरोप घेतला योगायोगाने त्याच दिवशी त्यांच्या विवाहाचा हिरक महोत्सव होता.

गॅरी सर्वात सफल बुध्दिबळपटू बनण्यामागे त्यांचे सर्वाधिक योगदान होते. त्याच त्याच्या मार्गदर्शक होत्या आणि जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी गॅरी दररोज आपल्या आईशी बोलून त्यांचे मार्गदर्शन घेत असे.

गॅरीने बालपणी आपल्या पालकांसोबत खेळूनच बुध्दिबळाला सुरुवात केली होती. त्यांच्याकडून खेळाची कौशल्ये आत्मसात केल्यावर तो लवकरच आपल्या आईला हरवू लागला होता. क्लारा या बहुतेक स्पर्धांना गॅरीसोबत असायच्या. त्यांना असे वाटायचे की, आपली आईच मुलासाठी सर्वोत्तम मार्गदर्शक असते. कास्पारोव्हने मागे एकदा फेसबूक पोस्टमध्ये म्हटले होते की, क्लारा यांनी त्याच्या बिछान्यापाशी एक संदेश लिहून ठेवलेला होता की, तू नाही तर कोण करणार?

गॅरी कास्पारौव्हने 2005 मध्ये स्पर्धांतून निवृत्ती घेतली. त्यानंतर ते लोकशाही चळवळीत उतरले आणि 2013 मध्ये ते न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाले. तो म्हणतो की समस्या कोणतीही असो, माझी आई हिच माझी सर्वात चांगली संकटमोचक होती. शिवाय तिच्याशी मी जेवढ्या मोकळेपणाने बोलू शकत होतो तेवढा मोकळेपणा इतर कुणाशीच नव्हता. संकटसमयी किंवा अडचणीच्यावेळी तिचा केवळ आवाजसुध्दा मला विश्वास द्यायचा.

क्लारा ह्या 25 डिसेंबर 1960 रोजी किम वेनस्टीन यांच्याशी विवाहबध्द झाल्या आणि 1963 मध्ये गॅरी कास्पारोव्हचा जन्म झाला. क्लारा कास्पारोव्हा व वेनस्टीन यांना बुध्दिबळ खूप आवडायचे. एका दिवशी वर्तमानपत्रात आलेले बुध्दिबळाचे कोडे सोडवायचा ते प्रयत्न करत होते. त्यावेळी गॅरी फक्त 5 वर्षांचा होता आणि त्याने त्या कोड्याचे उत्तर आपल्या पालकांना सांगून चकित केले होते. तेथून गॅरी कास्पारोव्हच्या बुध्दिबळ प्रवासाला सुरुवात झाली होती. त्यानंतर दोनच वर्षात विन्स्टीन यांचे निधन झाले आणि गॅरीचे संगोपन त्याच्या आईनेच केले. त्यानंतर त्यांनी कास्पारोव्हला विश्वविजेता बुध्दिबळपटू बनवले. त्यासाठी त्यांनी आपली अभियंत्याची नोकरीसुध्दा सोडून दिली. एवढेच नाही तर दुसरे लग्नसुध्दा केले नाही. 1985 मध्ये गॅरी वयाच्या 22 व्या वर्षी विश्वविजेता बनला. अजुनही सर्वात कमी वयातील बुध्दिबळ विश्वविजेत्याचा विक्रम गॅरी कास्पारोव्हच्या नावावर आहे. क्लारा यांच्या पश्चात मुलगा गॅरीशिवाय चार नातवंडे आहेत.

रशियन सत्ताधारींसोबत मतभेदामुळे गॅरी कास्पारोव्ह यांना निर्वासितासारखे वेगवेगळ्या देशांमध्ये रहावे लागत आहे. व्लादीमिर पुतीन यांच्यावर तो टीका करत आलाय त्यामुळे गॅरी आईसोबत राहू शकला नाही. त्याची आईसोबत शेवटची भेट नोव्हेंबर 2019 मध्ये लिथुआनियात झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER