लसूण : आयुर्वेदानुसार उग्रगंधी, रसायन !

Garlic

लसूण (Garlic) हा स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक. लसणाशिवाय अनेकांच्या घरात भाज्या बनतच नाहीत. लसणाची खमंग फोडणी किंवा ठेचलेला लसूण पंजाबी पदार्थांचा आवश्यक घटक असतो. मराठी खाद्यपदार्थांमध्ये भरीत, शेवभाजी, मसाला वांगे यासारखे पदार्थ लसूण वापरल्याशिवाय अपूर्णच वाटतात. ठेचा किंवा चटण्यांमध्ये लसूण सहसा असतोच. असा हा लसूण उग्र वासाचा, पदार्थांना तीक्ष्णता आणणारा असतो.

आयुर्वेदात रसोन, महौषध अशी अनेक पर्यायी नावे आली आहेत. लसूण हे नाजूक क्षुप असते. लसूण हा तीव्र वास असणारा जरी असला तरी त्याची चव ही पाच रसांची असते. यात फक्त आंबट रस नसतो. बाकी षडरसांपैकी पाच रस या लसणात असतात. पण तिखट रस प्रखर असतो.

लहसुन के फायदे और नुकसान - Garlic (Lahsun) Benefits and Side Effects in Hindiवातविकारांकरिता लसूण महौषध आहे. संधिवात सियाटिका, पक्षाघात अशा सर्वच वातविकारांवर लसूण कल्काचा लेप किंवा लसूण ठेचून त्याचा रस लावावा. लसूण उत्तम वातशामक असल्याने वेदना, सूज कमी करतो.

विषारी कीटकदंशाने अति खाज सुटत असेल तर लसूण वाटून त्याचा लेप लावल्यास आराम पडतो.

कान दुखत असेल तर लसूण पाकळ्या अथवा ठेचून कल्क, तेलात उकळवून घ्यावे. असे लसणाचे तेल कानात टाकावे किंवा लसूणरस एक-दोन थेंब कानात घालावेत.

मूळव्याधीत लसूण फायदेशीर ठरतो. लसूण यकृताचे कार्य सुधारते. तसेच अपचन, अजीर्ण, मलावरोध ( पोट साफ नसणे) या तक्रारी दूर होतात. परंतु ज्यांना गुदमार्गातून मूळव्याधीतून रक्त पडत असेल त्यांनी खाऊ नये.

लसूण उग्र वासाचा तीक्ष्ण असल्यामुळे कफ पातळ करणारा आहे. कफाचा दुर्गंध कमी करणारा आहे. लहान बाळांना गळ्यात लसणाची माळ बांधतात. लसणाच्या तीक्ष्ण व कफ पातळ होण्याच्या गुणामुळे छातीत साठलेला कफ कमी होतो. लसूण जंतुनाशक आहे. त्यामुळे पूय पेशींचा नाश करतो. प्रतिश्याय राजयक्ष्मा श्वास अशा व्याधींमध्ये लसूण औषधी मात्रेत उपयोगी आहे. छातीत कफ साठला असेल तर लसणाचे तेल छातीला चोळतात.

रक्तदाब वाढला असल्यास लसूण उपयोगी आहे. लसूण रक्तवाहिन्यांच्या भिंतींमधील मेद कमी करतो. त्यामुळे संकुचित झालेल्या रक्तवाहिन्या सामान्य होतात. त्यामुळे रक्तदाब कमी होतो.

लसूण आयुर्वेदात अनेक व्याधींमध्ये औषधी मात्रेत वापरला जातो. प्रजनन व्याधी, शुक्रदोष, मूर्च्छा, अपस्मार (फीटस्) अशा विविध व्याधींच्या औषधी कल्पांमध्ये लसणाचा उपयोग केला आहे.

लसूण उग्र, उष्ण, तीक्ष्ण असल्याने पित्तप्रकृती, उष्णतेचे आजार, रक्तविकार, गर्भिणी यांनी लसूण घेऊ नये. लसूण उष्ण, तीक्ष्ण प्रकृती गर्भावस्थेत हानीकारक ठरू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER