आ. आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, गारगाई धरणासाठी चार लाख झाडांची कत्तल

CM Uddhav Thackeray - Ashish Shelar

मुंबई : पालघर जिल्ह्यातील गारगाई धरणावरून भाजपाने ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. या धरणासाठी तब्बल चार लाख झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी मुंबईपासून ११० किलोमीटर अंतरावर गारगाई येथे हे धरण उभारण्यात येत आहे. मुंबईतील पर्यावरणाला पूरक असलेल्या मेट्रोसाठी ४०० झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. त्यामुळेच आरेच्या जंगलासाठी तुम्ही झटता, मग, गारगाई धरणासाठी झाडांची कत्तल कशी करता? असा थेट सवाल भाजपा नेते आ. आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

मुंबईत उड्डाणपूल, महामार्गांवर वाहन चालवित असाल तर… होशियार!

या धरणाला स्थानिकांनी विरोध केला आहे. १८५ कुटुंब विस्थापित होणार असून, जैवविविधता नष्ट होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत एक खाजगी मराठी वृत्तवाहिनीने आज शनिवारी वृत्त दिले आहे. ८३० हेक्टर जमीन या धरणामुळे पाण्याखाली जाणार असून, यातील ६१२ हेक्टर ही वनजमीन आहे. २१८ हेक्टर जमीन खाजगीरीत्या संपादित करण्यात येणार आहे. एकूण ३ हजार १०५ कोटींचा हा प्रकल्प आहे. मुंबईकरांना या धरणामुळे ४४० दशलक्ष घनमीटर पाणी मिळणार आहे.

या मुद्यावर वृत्तवाहिनीशी बोलताना आज आ. आशिष शेलार म्हणाले, आमचा या प्रकल्पाला विरोध नाही. परंतु, मेट्रोसाठी ४०० झाडे तोडायला विरोध करणारे ठाकरे सरकार या धरणामुळे आता, आपलेच दात आपल्याच घशाखाली घालायला निघाले आहे. हे बेगडी सरकार आहे.

दरम्यान, भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही या प्रकल्पावरून ठाकरे सरकार हे दुटप्पीपणा करीत असल्याची जोरदार टीका केली आहे.