गणपती बाप्पा मोरया, कोरोनाला हरवू या !

Ganpati

Shailendra Paranjapeपुण्याचा गणेशोत्सव देशभर नव्हे तर जगभर पोहचलाय. मानाचे पाच गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळ, गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ करणारं भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळ ही सारी मंडळं आणि शहरातली अन्य काही मंडळे उत्सवाला शुभंकर, लोककल्याणकारी बनवण्यासाठी गेली काही वर्षे झटत आहेत.

पुण्यानं उपक्रम सुरू करावा आणि मग तो इतरत्र पसरावा, हे काही नवं नाही. मंडई मंडळाच्या झुणका-भाकर केंद्राची प्रेरणाच शिवसेनेने (Shivsena) १९९५ च्या सरकारच्या कार्यकाळात सुरू केलेल्या झुणका-भाकर योजनेमागं होती, हे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनीच जाहीरपणे सांगितलं होतं. तसंच यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या रोशनाई, देखावे यापेक्षा कोरोना संसर्गग्रस्तता लक्षात घेऊन साधेपणानं आणि सेवा-उत्सव म्हणून साजरा करायचा, हेही पुण्यानं (Pune) सर्वांत आधी जाहीर केलं. नंतर राज्यभर गणेश मंडळे आरोग्यविषयक उपक्रम राबवतील, अशी आशा आहे.

ही बातमी पण वाचा : संजय राऊत यांना नेमके म्हणायचेय तरी काय?

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वराज्य मिळालं पण त्याचं सुराज्य होणं आवश्यक आहे, या भावनेतून पुण्यातली अनेक गणेश मंडळे वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्यातून समाजातल्या वंचित, शोषित घटकांसाठी, गरीब रुग्ण, अपंग, अनाथ, बहुविकलांग अशा सर्वांसाठी विविध प्रकारची कामं उभी राहिली आहेत.

कोरोनाकाळात (Corona) मानाचे पाच गणपती मानले जातात ती आणि इतर तीन मंडळं म्हणजे ग्रामदैवत असलेले कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग मंडळ आणि केसरीवाड्याचा गणपती तसेच दगडूशेठ, मंडई मंडळ, भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी एकत्र येऊन एक जम्बो कोरोना केअर सेंटर उभारण्याची, चालवण्याची जबाबदारी घेतलीय.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहात लवकरच कार्यान्वित होत असलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये ४०० जणांची सोय होणार आहे. त्यासाठी डॉक्टर्स, रुग्णसेवा या साऱ्यांची जबाबदारी या मंडळांच्यावतीनं घेतली जाणार आहे. ४०० खाटांमध्ये २० ऑक्सिजन पुरवठ्याची सोय असलेल्या खाटा रुग्णांसाठी पुरवण्यात येणार आहेत.

शारीरिक प्रतिकारशक्ती वाढवतानाच मानसिक शक्ती वाढवण्यावरही येथे भर दिला जाणार आहे. गणपतीबाप्पा मोरया, कोरोनावर मात करू या, अशी पोस्टर्स या केअर सेंटरमध्ये ठिकठिकाणी लावली जाणार आहेत. त्यामुळं यंदाचा गणेशोत्सव खऱ्या अर्थानं सेवा-उत्सव म्हणून साजरा केला जाईल.

पुण्यातली इतर अनेक गणेश मंडळे समर्थ भारत अभियानांतर्गत उभारल्या जात असलेल्या कोविड केअर सेंटरच्या कार्यात सहभागी झालेली आहेत. पुण्यात कोरोना मुकाबल्याच्या एकूण युद्धात किमान ६० टक्के मंडळी ही गणेशोत्सवातून आलेली आहेत आणि कोणत्याही आपत्तीच्या वेळी त्यांचा असाच सहभाग असतो, हे लक्षणीय आहे. गणपती म्हणजे विघ्नहर्ता आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणजे विघ्नहर्त्याचे गण, राज्यभर या सर्वांची शक्ती एकत्र आली तर कोरोनाच काय कोणत्याही संकटावर मात करता येईल, इतकी ताकद राज्यातल्या गणेश मंडळांकडे नक्कीच आहे. त्यामुळे यंदा गणपती बाप्पा मोरयाचा गजर करतानाच, कोरोनाला हरवू या, हा निर्धार व्यक्त करूनच गणेशोत्सव साजरा करू या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER