`गंगूबाई काठियावाडी’स मनाई करण्यासाठीचा दावा फेटाळला

Gangubai Kathiawadi

मुंबई :- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या ‘भन्साळी प्रॉडक्शन्स’ या कंपनीतर्फे तयार करण्यात येत असलेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या आगामी चित्रपटाच्या चित्रपटगृहांत अथवा अन्य कोणत्याही माध्यमांतून प्रदर्शन करण्यास मनाई करावी यासाठी करण्यात आलेला दावा येथील दिवाणी न्यायालयाने फेटाळला.

स्वत:ला ‘गंगूबाई काठियावाडी’चा दत्तक मुलगा म्हणविणार्‍याया बाबुुजी शहा नावाच्या व्यक्तीने हा दावा दाखल केला होता. चित्रपटात गंगूबाईचे पात्र गुन्हेगारीचे दाखविलेले आहे. त्यामुळे आपल्या आईच्या व पर्यायाने आपल्या प्रतिष्ठेस बट्टा लागत असल्याने हा चित्रपट आपल्या ‘प्रायव्हसी’च्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे, असे शहा यांचे म्हणणे होते. त्यांचे म्हणणे असेही होते की, माझी आई गंगूबाई कुंटणखाना चालविणारी नव्हती तर कुंटणखात्यात पिचत पडणार्‍या वेश्यांच्या कल्याणासाठी झटणारी सामाजिक कार्यकर्ती होती.

‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाची पटकथाहुसैन झैदी व जेन बोर्जेस यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या कादंबरीतील एका प्रकरणावर आधारलेली आहे. त्या प्रकरणात झैदी व बोर्जेस यांनी एकेकाळी मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात दरारा असलेल्या, कामाठीपुर्‍यातील एका कुंटणखान्याची मालकीण ‘गंगूबाई काठियावाडी’ हिचे चरित्र रंगविले आहे. थोडक्यात भन्साळी यांचा चित्रपट हा त्या गंगूबाईचा चरित्रपट आहे. त्यात अभिनेत्री आलिया भट गंगूबाईची मुख्य भूमिका करत आहे. शहा यांनी दाव्यामध्ये या कादंबरीच्या पुनर्मुद्रणास व वितरणासही मनाई करण्याची मागणी केली होती.दाव्यात भन्साळी व त्यांच्या कपनीने एक ‘नोटिस ऑफ  मोशन‘उत्तर दाखल करून दावा फेटाळण्याची विनंती केली. त्यात प्रामुख्याने दोन मुद्दे मांडण्यात आले. एक, झैदी यांची कादंबरी सन २०११मध्ये प्रसिद्ध झाली आहे व शहा यांनी हा दावा आत्ता डिसेंबर २०२० मध्ये केला आहे. त्यामुळे कायद्यानुसार तो उघडपणे कालबाह्य आहे. दोन, आपण गंगूबाईचा दत्तक मुलगा असल्याचा शहा यांचा दावा असला तरी त्यासाठी त्यांनी कायदेशीर दत्तकविधान झाल्याचा कोणताही पुरावा दिलेला नाही. दिवाणी न्यायाधीश आर. एम. सदराणी यांनी ही ‘नोटिस ऑफ मोशन’ मान्य करून शहा यांचा दावा फेटाळला.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER