कामठीत किशोरीवर सामूहिक अत्याचार; तीन अल्पवयीन आरोपींना अटक

नागपूर :- एका अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घृणास्पद आणि धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मंगळवारी रात्री घडलेल्या या गुन्ह्यात तीन आरोपींना आज बुधवारी पोलिसांनी तातडीने तपास करून अटक केली. हे तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रनाळा-भिलगाव मार्गावर सदर किशोरी आपल्या मित्राला लकी फार्महाऊसच्या मागे भेटायला गेली होती. यावेळी आरोपी तिथे आलेत. त्यांनी मुलीला व तिच्या मित्राला पट्टा काढून मारहाण केली. त्यानंतर तिन्ही आरोपींनी मुलीवर सामूहिक अत्याचार केला. या आरोपींनी मुलीचे व तिच्या मित्राचे पैसे आणि मोबाईलही हिसकून घेतलेत.

ही बातमी पण वाचा : ‘तुझ्यात अपवित्र आत्मा आहे,’ असं सांगत भोंदूबाबाचा गायिकेवर बलात्कार  

पीडितेने सुरुवातीला कळमना पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी धाव घेतली. त्यांनी तिला नवीन कामठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर नवीन कामठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच, डीसीपी नीलोत्पल आणि एसीपी बनसोड यांनी नवीन कामठी पोलिस ठाण्यास भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली आणि पीडितेला वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली.