
नवी दिल्ली : गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी असं परखड मत इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या एका लेखामध्ये व्यक्त केलं आहे. गुहा यांनी आपल्या लेखामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये मत व्यक्त करताना म्हटले आहे की, काँग्रेस कधीच भाजपाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकत नाही असंही म्हटलं आहे. तसेच रामचंद्र गुहा (Ramachandra Guha) यांनी आपल्या या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजपाध्यक्ष (BJP) जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांचा देखील उल्लेख केला आहे. भाजपाचे हे तिन्ही प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले आहेत. तसेच या तिघांनाही राजकारण हे वारसा म्हणून मिळालेलं नाही.
मोदी, शहा आणि नड्डा या तिघांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे घेऊन जाण्याची ताकद असून सध्या ते तेच करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती उलट असून तिथे तिन्ही मोठे नेते वैचारिक पातळीवर एकमेकांशी जोडलेले दिसत नाहीत. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत कारण त्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे असं गुहा यांनी म्हटलं आहे. गांधींनी आता जाणं गरजेचे का आहे? असा एक लेख गुहा यांनी लिहिला आहे. या लेखात त्यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
काँग्रेस (Congress) एकीकडे आपण उदारमतवादी असल्याचे सांगत त्याचे श्रेय घेते. तर दुसऱ्या दिवशी ते उद्योजकांना विरोध करताना दिसतात असं गुहा यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि भाजपाच्या नेतृत्वामध्ये तीन मुद्द्यांवरुन खूप मोठा फरक लक्षात येतो असं गुहा यांनी लेखात म्हटलं आहे. भाजपाचे नेतृत्व हे सेल्फ मेड म्हणजेच स्वत: घडवलेलं नेतृत्व आहे. ते वैचारिक स्तरावर एका पातळीवर आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते कोणत्याही मोठ्या कुटुंबातून आलेले नाहीत असं म्हटलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला