सिडनी कसोटी आणि नियम, भारतासाठी ‘थोडी खुशी, थोडा गम’

येणाऱ्या वर्षात कसोटी क्रिकेटच्या नोंदी पाहिल्या जातील तेंव्हा भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या (India Vs Australia) सिडनी कसोटीची (Sydney Test) केवळ अनिर्णित अशी नोंद दिसेल पण त्यातुन त्या सामन्यात जो रोमांच बघायला मिळाला, जो संघर्ष बघायला मिळाला आणि भारतीय संघाने ज्या जिद्दीने लढून तो सामना अनिर्णित सोडवला ते दिसणार नाही. तो रोमांच आणि ती मजा फक्त त्यांनाच माहित असेल ज्यांनी या सामन्याचा खेळ पाहिला किंवा ऐकला असेल. या सामन्यातील रिषभ पंत (Rishabh Pant), हनुमा विहारी (Hanuma Vihari) व रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांनी जायबंदी असतानाही पाय रोवून केलेला खेळ पाहता कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात धाडसी डावांपैकी एक डाव अशी या डावाची नोंद होईल.

सिडनी कसोटीत भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा मार व शिवीगाळ झेलत जो खेळ केला तो मैदानावरील शौर्याचे उदाहरण म्हणून तर नेहमीच दाखविला जाईल पण यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) च्या काही नियमांतील बदलांचीही चर्चा होत आहे. या बदलांचा फार मोठा परिणाम या सामन्यावर दिसला.

पहिला म्हणजे 2017 मध्ये आलेला बदली यष्टीरक्षकाचा नियम आणि दुसरा म्हणजे 2011 मध्ये आलेला जखमी फलंदाजाला रनर न देण्याचा नियम!

आता हे स्पष्टच आहे की बदली यष्टीरक्षकाचा नियम भारताच्या पथ्यावरच पडला. कारण हा नियम नसता तर तिसऱ्या दिवशी पॕट कमिन्सच्या चेंडूवर कोपराला दुखापत झालेल्या रिषभ पंतच्या जागी आपण वृध्दिमान साहाला आपण दुसऱ्या डावात यष्टीरक्षक म्हणून उतरवू शकलो नसतो. ती विश्रांती मिळाली म्हणून शेवटच्या दिवशी रिषभ पंत ती 97 धावांची धडाकेबाज खेळी करु शकला. वेदना तर होत्याच पण त्याला यष्टीरक्षणही करावे लागले असते तर दुसऱ्या डावात तो तशी फलंदाजी करु शकला असता का?

2017 मधील तो नियम नसता तर प्लेईंग ईलेव्हनमधल्याच कुणाला तरी यष्टीच्या मागे उभे रहावे लागले असते आणि बहुधा ही जबाबदारी हनुमा विहारीच्या खांद्यावर आली असती. कारण हनुमा विहारी हा रणजी सामन्यात यष्टीरक्षक म्हणून खेळलेला आहे. हैदराबादसाठी हिमाचलविरुध्द त्याने दीडशेच्यावर षटके यष्टीरक्षण केल्यावर 621 मिनीटांची 263 धावांची खेळीसुध्दा केली होती.

पण 2017 मधील या नव्या नियमामुळे भारताला वृध्दिमान साहाला खेळवता आले आणि त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात चार झेल टिपले. त्यात 73 धावा करणारा लाबुशेन आणि 84 धावा करणारा कॕमेरान ग्रिन होता. लाबूशेनला बाद करण्यासाठी लेग साईडला झेपावत त्याने घेतलेला झेल तर अफलातून होता.असे झेल सहसा नियमीत यष्टीरक्षकच घेऊ शकतात. हुनुमा विहारीला अशी कामगिरी शक्य झाली असती का? त्यानंतर रिषभ पंत दुसऱ्या डावात फलंदाजीला आला आणि त्याने पुजाराच्या जोडीने एकवेळ भारताच्या विजयाची शक्यताही निर्माण केली त्यावेळी काहींनी प्रश्न उपस्थित केला की जो संपूर्ण दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करु शकला नाही तो फलंदाजी कसा करु शकतो? पण हे सर्व नियमाला धरुनच होते.

भारताला बदली यष्टीरक्षक म्हणून मूळ यष्टीरक्षकापेक्षा चांगला यष्टीरक्षक मिळाला आणि चांगला फलंदाजही मिळाला म्हणून आॕस्ट्रेलियन समर्थकांचा तीळपापड झाला. हे तर 12 खेळाडूंसह खेळताहेत अशी टीकाही काहींनी केली कारण लाबूशेनचा जो झेल साहाने घेतला तो रिषभ पंतने 10 पैकी 9 वेळा सोडला असता असे त्यांना वाटत होते आणि जो बॕट हाती घेऊ शकतो तो ग्लोव्हज का वापरू शकत नाही असा त्यांचा रोकडा सवाल होता. हे आक्षेप तत्वतः योग्य जरी असले तरी ते नियमानुसारच होते.

क्रिकेटमध्ये कन्कशनचा अपवाद सोडला तर नियमानुसार दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी आलेला बदली खेळाडू मूळ खेळाडूचे मूळ काम करु शकत नाही. म्हणजे फलंदाजाच्या किंवा गोलंदाजाच्या जागी आलेला बदली फक्त क्षेत्ररक्षण करु शकतो, फलंदाजी किंवा गोलंदाजी नाही.

यष्टीरक्षकाच्या बाबतीत मात्र असे नाही.म्हणून या नियमात बदलाचीही मागणी होत आहे. यष्टीरक्षकाच्या बाबतीतही कन्कशनप्रमाणे निकष लावण्यात यावेत अशी मागणी जोर धरत आहे.

अशा प्रकारे यष्टीरक्षकाच्या नियमाने टीम इंडिया फायद्यात राहिली असली तरी ‘रनर’ च्या नियमाने तोटासुध्दा सहन केला. भारताच्या दुसऱ्या डावात 27 चेंडूत 3 धावा केल्यावर हनुमा विहारीला हॕमस्ट्रिंग इन्जुरी झाली. तो धावणे तर सोडा पण चालुसुध्दा शकत नव्हता अशी स्थिती होती पण त्याही स्थितीत त्याने तब्बल 286 मिनीटे म्हणजे जवळपास पावणेतीन तास फलंदाजी केली. आॕस्ट्रेलियन गोलंदाजांना दाद न देता तो नाबाद परतला तेंव्हा चालण्यासाठी तो बॕटीचा आधार घेताना दिसला. पण रनर नाही आॕक्टोबर 2011 मधील नियमानुसार विहारीला स्वतःलाच धावावे लागले. पूर्वीचे नियम असते तर त्याला रनर मिळाला असता पण रनरअभावी त्याने व अश्विनने बऱ्याचदा धावसुध्दा घेणे टाळल्याचे दिसले.

नियम काहीही असोत पण सिडनीतील हा खेळ रिषभ पंतची प्रतिमा उंचावेल, त्याचा सन्मान वाढवेल, अश्विनची उपयुक्तता अधोरेखीत होईल आणि विहारीला संघात स्थानाची निश्चिती लाभेल अशी आता आशा बाळगण्यास हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER