‘जेवढा प्रवास तेवढाच टोल !’ गडकरींची लोकसभेत घोषणा

Nititn gadkari - Toll Tax - Maharastra Today

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यात येतील. टोलच्या जागी जीपीएस यंत्रणा बसवण्यात येईल, असं नितीन गडकरी म्हणाले. सर्व टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. लोक रस्ते प्रवास जेवढा करतील, तेवढाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम सुरू असल्याचं गडकरींनी नमूद केलं.

उत्तरप्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी महापालिकेच्या टोलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर गडकरींनी उत्तर दिलं.

गडकरींनी मागील सरकारकडे बोट दाखवत सांगितले की, या आधीच्या सरकारांनी अनेक ठिकाणी, अनेक शहरांत अन्यायी पद्धतीने टोलनाके बसवले. त्या आधारे टोल चोरी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. त्यामुळे येत्या वर्षभरात देशातील सर्व टोलनाके बंद करण्यात येतील. टोलनाक्यांद्वारे मलई खाण्यासाठी असे छोटे छोटे टोल उभारण्यात आल्याचं म्हटलं. शहरांच्या सीमांवर असे टोल असणे चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

नितीन गडकरी म्हणाले, जर आम्ही टोलनाके बंद केले तर रस्ते बनवणाऱ्या कंपन्या आमच्याकडे भरपाई मागतील. मात्र सरकारने पुढील वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्याची योजना केली आहे. टोल हटवणे म्हणजे टोलनाके हटवणे असा अर्थ आहे. सध्या सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, जिथे तुम्ही हायवेवर प्रवेश करताच, जीपीएसच्या मदतीने तुमचा फोटो काढला जाईल. जिथून तुम्ही हायवे सोडाल, तिथेही फोटो घेतला जाईल. म्हणजे तुम्ही जेवढा हायवेचा प्रवास केला किंवा जेवढा रस्ता वापरला तेवढाच टोल तुम्हाला द्यावा लागेल, असं गडकरी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER