‘मला पुन्हा नक्षली व्हायला भाग पाडू नका’, गडकरींचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Nitin Gadkari

नवी दिल्ली :- ‘मी आधी नक्षलवादी होतो. नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये (Rashtriya Swayamsevak Sangh) गेलो. मला पुन्हा नक्षली व्हायला भाग पाडू नका.’ असा दम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. नुकताच गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केरळमधील कामांचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीमध्ये गडकरींनी हे वक्तव्य केलं. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यासमोरच रस्तेबांधणीच्या कामांमध्ये अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांना गडकरी यांना धारेवर धरले.

वेगवेगळ्या विकासकामांच्या फाइल्स अडवून ठेवू  नका, असे आदेशही गडकरींनी सरकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. “मला ठाऊक आहे अडथळे निर्माण करणारे कोण-कोण आहेत, इथे मी बॉस आहे हे लक्षात घ्या. राज्यातील रस्त्यांच्या कामासाठी विजयन यांनी मला भेटण्याची ही पाचवी वेळ आहे, हे लज्जास्पद आहे.” असं मत गडकरींनी अधिकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केलं. आपल्या या इशाऱ्यामध्ये गडकरींनी सरकारी अधिकाऱ्यांना रस्तेबांधणीसाठी जमीन अधिग्रहण करायला वेळेचे बंधन दिले आहे. वेळेत कामं झाली नाहीत तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा गडकरींनी यांनी अधिकाऱ्यांना दिला.

केरळ सरकारने राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग बांधण्यासाठी २५ टक्के खर्च उचलण्याची तयारी दाखवल्यानंतर केंद्राने अनेक प्रकल्पांना मंगळवारी तातडीने मंजुरी दिली आहे. मंगळवारी गडकरींची भेट घेण्याआधी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी वायनाडचे खासदार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राष्ट्रीय महामार्गावर रात्री अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतुककोंडीसंदर्भात काय करता येईल यावर या दोघांनी चर्चा केली. तसेच नवीन महामार्ग बांधताना स्थानिकांच्या विस्थापन आणि पुनर्वसनासंदर्भातील माहिती राहुल यांनी मुख्यमंत्र्यांकडून घेतली.

काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री विजयन यांनी केरळमधील रस्त्यांचे प्रकल्प अडकून पडण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केला होता. मागील अनेक वर्षांमध्ये केरळने कमावलेले सर्व काही केंद्राच्या आडमुठ्या भूमिकेमुळे गमावण्याची शक्यता आहे, असं सांगत विजयन यांनी राज्यातील महामार्ग विकासाच्या थांबलेल्या कामांसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button