गडकरीसाब, तुम्हारा चुक्याच…

Shailendra Paranjapeभारतीय जनता पक्षाला (BJP) २००४ ची लोकसभा निवडणूक जिंकता आली नाही आणि यूपीएचे सरकार सत्तेवर येऊन डॉ. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान बनले. त्या वेळी निवडणुकीच्या काळात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या एनडीए सरकारचा विजय म्हणजे केवळ औपचारिकता आहे, इतकं फील गुडचं वातावरण देशभर तयार केलं गेलं होतं. स्वर्गीय प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांनी त्या काळात दिल्लीतल्या आम्हा काही पत्रकार मित्रांना सांगितलं होतं की आम्ही लोकसभा निवडणूक चार राज्यांतल्या विधानसभा निवडणूक यशामुळे सहा महिने आधी घेतली आणि लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या प्रचारसभेत वाजपेयीजींनी आपल्या भाषणानंतर मला सांगितलं होतं की प्रमोदजी हम चुनाव हार चुके हैं !

राजकारण असो की वैयक्तिक जीवन, संयम या गुणाला खूपच महत्त्व आहे. डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) पंतप्रधान झाल्यावर ते सरकार संयुक्त पुरोगामी आघाडीचे असल्याने आणि त्यात साठच्या वर डाव्या पक्षांचे खासदार असल्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं भाकीत देशभरातल्या पत्रपंडितांनी केलं होतं. तेव्हाही मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या पहिल्या संसद अधिवेशनाच्या वेळी प्रमोद महाजन यांनी आम्हाला सांगितलं होतं की देशभरातल्या तुमच्या पत्रकार तज्ज्ञांनी हे सरकार दीड वर्षे, अडीच वर्षे किंवा फार फार तर साडेतीन वर्षे टिकेल, असं लिहिलंय. पण मला विचाराल तर हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि आम्ही जनतेने दिलेला कौल खुलेपणाने स्वीकारला नाही तर पुढची पाच वर्षेही टिकेल. अगदी तसंच झालं.

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं कालपरवाचं विधान आणि नंतर त्यांना करावी लागलेली सारवासारव. नॉट फोल्युअर, बट लो एम इज क्राइम, असं एक इंग्रजी वचन आहे. गडकरीसाहेब त्याचं पालन करतात आणि खिशात फारसे पैसे नसताना काही हजार कोटीच्या बांद्रा-वरळी सी लिंकचं स्वप्न त्यांनी दाखवलं, ते प्रत्यक्षातही आलं. पण मंत्री म्हणून झपाट्याने धडाक्याने काम करतानाच अनेकदा मुंगेरीलाल के हसीन सपने वाटतील, अशा योजना ते सांगत असतात. कदाचित त्यांना खूपच दूरदृष्टी असणार…

पण राजकारणात संयम लागतो आणि तो त्यांच्याकडे नाही, हे त्यांनी यापूर्वीही सिद्ध केलेय. त्यात २०१४ च्या मोदीलाटेमुळे केंद्रात सत्तेवर आलेल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या मोदी-अमित शहा जोडीच्या मर्जीतले गडकरी नाहीत, हे काही लपून राहिलेले नाही. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या काळात एनडीएला बहुमत मिळणार नाही, हे अनौपचारिकपणे सांगणारे अनेक नेते भाजपामधलेच होते. अर्थात, एनडीए घटक पक्ष मोदी नकोत या अटीवर कदाचित आपल्या नावावर एकमत होऊ शकते, हा विचारही या नेत्यांचा असू शकतो. पण एरवी धडाक्यात काम करणाऱ्या गडकरी यांनी आपल्याच सरकारला लसींवरून परवा घरचा आहेर दिला. कोरोनाच्या संकटातून देश जात असताना आणि पंतप्रधान मोदींवर त्यांच्या कट्टर विरोधकांकडून कोरोनाच्या अपयशासाठी टीका होत असताना अचानक गडकरी यांनी केंद्र सरकारला लसींवरून सुनावले. स्वदेशी जागरण मंच या परिवारातल्या मंचाच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी केंद्र सरकारनं लसींचा पुरवठा वाढवायला हवा, असं मत व्यक्त केलं होतं. त्याबरोबरच मागणी आणि पुरवठा यातली दरी भरून काढण्यासाठी लसनिर्मितीसाठी एका कंपनीऐवजी आणखी दहा कंपन्यांना परवाने आणि रॉयल्टी द्यावी, असं मत गडकरी यांनी या कार्यक्रमात परवा व्यक्त केलं होतं.

वास्तविक, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री विशेषतः भाजपेतर पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री रोजच्या रोज मोदी सरकारवर टीका करताना आणि लसींच्या पुरवठ्यावरून लक्ष्य करत असताना अचानक गडकरी यांनी हे विधान केल्याने देशभर खळबळ माजली. पण केंद्र सरकारने विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आरोप फेटाळून लावले होते. गडकरी यांच्या वक्तव्यानंतर केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांची आपल्याला माहिती नव्हती, असं सांगण्याची नामुष्की गडकरींवर ओढवली. केंद्रीय रसायन आणि उर्वरक मंत्री मनसुख मांडवीय यांनी आपल्याला केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आणि केंद्र सरकारनं दहा कंपन्या आणि प्रकल्पांच्या माध्यमातून लसींच्या वाढीव निर्मितीचे प्रयत्न सुरू केले आहेत. आपण लसींबाबतचं वक्तव्य केलं तेव्हा आपल्याला केंद्राच्या या प्रयत्नांची माहिती नव्हती, असं सांगण्याची वेळ गडकरी यांच्यावर आली.

केवळ संयम न बाळगणे, बोलण्यापूर्वी माहिती न घेणे यामुळेच धडाक्यात काम करणाऱ्या गडकरींवर ही वेळ ओढवलीय. त्याबरोबरच केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती गडकरींनाच नव्हती. याचा अर्थ त्यांना केवळ रस्तेबांधणीपुरतेच ठेवलेय की काय, असाही प्रश्न निर्माण होतो. गडकरींच्या विधानाचे विविध प्रकारचे अर्थ काढले गेले तरी राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या टीकेकडे फारसे लक्ष न देता आपली मार्गक्रमणा सुरू ठेवणाऱ्या पंतप्रधानांनी स्वतः काहीही न बोलता रसायन आणि उर्वरक मंत्र्यांना गडकरींशी बोलायला सांगितले, यातच सारे आले. राजकारणात वेळोवेळी आणि कालानुरूप आपापली किंमत वाढवत नेणाऱ्या गडकरी यांच्या राजकीय वजनात या विधानाने आणि नामुष्कीने नक्कीच घट झाली आहे.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button