स्वीय सहाय्यकाचा जीव वाचवण्यासाठी गडकरींनी रात्री उघडायला लावले बँकेचे लॉकर

Nitin Gadkari

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) नेहमी आपल्या व्हिजन आणि स्पष्टवक्तेपणामुळे प्रकाश झोतात येत असतात. त्यांच्या भाषणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान नितीन गडकरी यांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओत नितीन गडकरींची भावनिक बाजू समोर आली आहे. आपल्या खासगी स्वीय्य सहाय्यकाचा जीव वाचवण्यासाठी कसे प्रयत्न केले हे नितीन गडकरी व्हिडीओत सांगत आहेत. स्वीय्य सहाय्यकाला एअर अ‍ॅम्बुलन्सने चेन्नईला नेण्यासाठी रात्रीच्या वेळी बँकेच्या सीईओला फोन करुन लॉकर उघडून ३५ लाख रुपये काढले असल्याचं नितीन गडकरी सांगत आहेत.

कोविडच्या काळात एक घटना घडली जेव्हा माझे खासगी स्वीय्य सहाय्यक मंडलेकर जे नागपूरचं काम पाहतात त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना विवेका रुग्णालयात भरती करण्यात आलं. ते नागपुरातील सर्वात चांगलं रुग्णालय आहे. मी डॉक्टरांना भेटलो असता त्यांनी आता आम्ही हरलो, काही करु शकत नाही असं सांगत हात टेकले. मी त्यांना उपाय विचारला असता त्यांनी चेन्नईमधील एमजीएम रुग्णालय जिथे ह्रदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण होतं तिथे नेल तर काही तरी होऊ शकतं सांगितलं. पण आयसीयूमध्ये आणि ऑक्सिजनवर असल्याने त्यांना न्यायचं कसं हा प्रश्न समोर होता? डॉक्टरांनी हात टेकले होते म्हणजे काय परिस्थिती होती समजा, असं नितीन गडकरींनी सांगितलं.

आमच्याकडे २४ तासांचा वेळ होता. मी घरी आल्यानंतरही चिंतेत होतो. कारण त्यांचे वडील माझ्या मोठ्या भावासारखे होते. माझ्या परिवारातील एक व्यक्ती अशा स्थितीत असल्यामुळे माझ्या मनात अस्वस्थता होती, रात्री झोप लागली नाही. मी घरी आल्यावर ऑफिसच्या स्वीय्य सहाय्यकांना गोळा केलं आणि लगेच एअर अ‍ॅम्बुलन्सची सोय करण्यास सांगितलं. एमजीएम रुग्णालयासोबत चर्चा केली. अमेरिकेतील डॉक्टर, मित्र शोधले. मला लगेच एमजीएम रुग्णालयाच्या एमडीचा, तसंच तेथील दीपा नावाच्या डॉक्टरांचा फोन आला. अ‍ॅम्ब्युलन्सवाला ३५ लाख रुपये अ‍ॅडव्हान्स पाहिजे असं सांगत होता. संध्याकाळी सहा वाजल्याने सगळ्या बँका बंद झाल्या होत्या. माझी बायको एका को – ऑपेरेटिव्ह बँकेची अध्यक्ष आहे. मी लगेच बँकेच्या सीईओना फोन करुन बोलावलं आणि रात्री लॉकर उघडता येईल का? असं विचारलं. मला लॉकरमधून ३५ लाख दे, मी तुला उद्याच्या उद्या पैसे परत करेन असं म्हटलं. ते पैसे आणले, कसं पाठवायचं ठरलं. त्या अ‍ॅम्ब्युलन्सवाल्याला पैसे दिले. मशीन घेऊन ते आले आणि पाच डॉक्टरही सोबत होते. एअरलिफ्ट करुन चेन्नईला नेलं. तिथे उपचार झाले आणि तो बरा झाला, अशी माहिती गडकरींनी दिली आहे.

बरा झाल्यानंतर तो माझ्याकडे भेटायला आला तेव्हा लहान मुलासारखा रडत होता. आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती मृत्यूला हात लावून परत आला आणि पुन्हा काम करु लागला याचा मला मनस्वी आनंद होता, असं गडकरी म्हणतात.

आयुष्यामध्ये केवळ सत्ता, संपत्ती हेच आयुष्याचं टार्गेट नसतं. सत्ता, संपत्ती ही केवळ माध्यमं आहेत, उद्दिष्ट असू शकत नाहीत. कारण मंत्रिपद किंवा किती सर्वोच्च सत्ता मिळाली तरी त्यातून काही समाधान मिळतं असं नाही. संपत्ती कितीही मिळाली तरी समाधान मिळत नाही. संपत्ती मिळवली तर कलह निर्माण होतो आणि परिवार दुःखी होतो. असं आपण अनेक लोकांच्या जीवनात पाहतो. जिथे गरिबी असते तिथे आनंद असतो आणि श्रीमंत घर म्हटलं की अडचणी वाढतात. पण या सगळ्या परिस्थितीमधून एका पारिवारिक भावनेतून, सामाजिक दायित्वातून एकमेकांशी व्यवहार करणं खूप महत्वाचा विषय आहे. प्रशासनात काम करत असताना सकारात्मकता ठेवणं महत्वाचं आहे. कायदा हा शेवटी जनतेकरिता आहे. गांधीजींनी सुद्धा सांगितलंय की कायदा हा गरीब शोषितांच्या हिताकरिता वेळ पडली तर तोडावा. त्यासाठी मागे पुढे पाहू नये, असं गडकरी व्हिडीओच्या अखेरीस सांगत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button