जमिनीचा मोबदला : गडकरी, फडणवीसांनी मान्य केली काँग्रेसची मागणी

नांदेड : प्रस्तावित असलेल्या नागपूर-बुटीबोरी ते तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात निर्माण झालेले आर्थिक प्रश्न निकाली काढण्यात काँग्रेस लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला यश प्राप्त झाले आहे. सरसकट मोबदला देण्याची खासदार अशोक चव्हाण यांची मागणी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे मान्य केली.

वरील महामार्गासह अन्य रस्त्यांच्या कामांच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस गुरुवारी मराठवाडय़ात आले होते. त्यादरम्यान काँग्रेसच्या आमदार अमिता चव्हाण, माजी राज्यमंत्री आमदार डी. पी. सावंत, माजी आमदार रोहिदास चव्हाण तसेच नगरसेवक किशोर स्वामी यांनी नांदेड विमानतळावरच फडणवीस व गडकरी यांची भेट घेऊन मोबदल्यासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तत्पूर्वी खा.अशोक चव्हाण यांनी गडकरी व फडणवीस यांना एक सविस्तर पत्र लिहिले होते. त्या पत्रांच्या प्रती चव्हाण यांनी त्यांना सादर केल्या.

लोहा व परभणी येथील कार्यक्रमात मंत्री गडकरी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली होती; पण त्याआधी काँग्रेसच्याच नेतृत्वाला त्यांनी काही प्रश्नांच्या बाबतीत आश्वस्त केल्याची बाब आज येथे समोर आली. ३६१- बुटीबोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव लोहा ही तीन शहरे येतात. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जमिनीचे संपादन करत असताना ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील जमीनधारकांना कमी मोबदला मिळत आहे.

ग्रामीण भागात संपादित होणाऱ्या जमिनीला सरसकट १०० टक्के मोबदला मिळत नाही आदी बाबी समोर आल्यानंतर मागील तीन-चार महिन्यांत या भागात मोठा असंतोष पसरला होता. मात्र सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची बाब लक्षात घेऊन काँग्रेस नेत्यांनी हा विषय हाती घेत लक्ष वेधले. नांदेड विमानतळावरील चच्रेमध्ये गडकरी यांनी त्रुटी मान्य करून योग्य ती दुरुस्ती करण्याचे आश्वासन आमदार अमिता चव्हाण यांना दिले असल्याची माहिती समोर येत आहे.