अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला नव्हताच; गडकरींची स्पष्टोक्ती

मुंबई : राज्यात निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरही सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अशातच भाजप मुख्यमंत्रिपदावर आपला दावा करत आहे. तर शिवसेना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील समसमान वाट्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहे. यामुळे सत्तास्थापनेचा तिढा अधिकच वाढला आहे. त्यातच शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत येऊन राजकीय परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला.

ही बातमी पण वाचा:- दिल्लीसमोर ना शरद पवार झुकलेत, ना उद्धव ठाकरे झुकणार’ – संजय राऊत

“गरज पडल्यास मी मध्यस्थी करायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. जेवढी माझी माहिती आहे, त्यानुसार अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री ठरला नाही.” असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. यापूर्वीही गडकरी यांनी महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल, असं म्हटलं होतं. तसंच या प्रकरणाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा कोणताही संबंध नाही. मी मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी दिल्लीतच राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर भाजप नेतृत्वाचा नकार कायम आहे. त्यामुळे आता नितीन गडकरी हे स्वत: मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.