गडकरींनी तक्रार केली तो बजरंग हाच परबांचा सचिन वाझे बरं का?

Maharashtra Today

मुंबई :  भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्र परिषद घेऊन राज्याच्या परिवहन विभागात बजरंग खरमाटे हा मंत्री अनिल परब यांचा सचिन वाझे आहे का असा सवाल केला होता. आता या बजरंगाच्या अनेक लीला समोर येत आहेत. याच बजरंगाबद्दल केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी तीव्र नाराजी व्यक्त करणारे पत्र तेव्हाचे राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार (Sanjay Kumar) यांना लिहिले होते अशी धक्कादायक बाब आता समोर आली आहे.

सचिन वाझे (Sachin Vaze) जसा बडे अधिकारी आणि राज्यकर्त्यांसाठी कलेक्शन करायचा असा आरोप आहे, तशीच चर्चा या बजरंगाबद्दल परिवहन विभागात आहे. सोमय्या नेमके याच गोष्टीकडे अंगुलीनिर्देश केला आहे.सोमय्या यांच्या तक्रारीनंतर या बजरंग खरमाटेची किती चौकशी होईल, त्याच्यावर काही कारवाई होईल का हा प्रश्नच आहे. कारण, नितीन गडकरी यांनी २० आॅक्टोबर २०२० रोजी एक खरमरीत पत्र मुख्य सचिव यांना पाठविले होते आणि खरमाटेने कसा भ्रष्टाचार चालविला आहे याची धक्कादायक माहिती देत त्याच्यावर कारवाई करा असे बजावले होते. गडकरी केवळ केंद्रीय मंत्रीच नाहीत तर देशभरातील सर्व राज्यांचे परिवहन विभाग हे त्यांच्या अखत्यारित येतात. ते केंद्रात अतिशय शक्तिशाली मंत्री आहेत. असे असतानाही त्यांच्या पत्राला राज्य शासनाने यांनी किंमत दिल्याचे दिसत नाही. कारण खरमाटे आजही बिनदिक्कतपणे सेवेत आहे आणि त्याचे कारनामे सुरूच आहेत. गडकरींनी एवढे खरमरीत पत्र मुख्य सचिवांना पाठविल्यानंतर मुख्य सचिव त्यावर बसून राहिले नसतीलच. परिवहन विभागाच्या सचिवांना आणि त्यांच्या माध्यमातून परब यांना या विषयी माहिती तेव्हा दिली गेली असेलच. मग कारवाई काय झाली हे आता परिवहन विभागाने समोर येऊन सांगायला हवे.

काय लिहिले होते गडकरींनी त्या पत्रात? नागपूर जिल्ह्यात केळवद, खुर्सापार, कांद्री, देवरी या इंटरस्टेट आरटीओ पोस्टवरून मोठ्या प्रमाणात आंतरराज्य व आंतरजिल्हा वाहतूक सुरू असते. मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकरी आणि व्यापाºयांना फळे, भाजीपाला व धान्य तसेच इतर माल शहरात आणण्यासाठी या चेकपोस्टवरून जावे लागते. शेतकरी व व्यापारी हे शासकीय नियमांनुसार वाहनांच्या वजनाबाबतची माहिती व कागदपत्रे जवळ ठेवतात. परंतु चेकपोस्टवर आरटीओ अधिकारी (ग्रामीण) बजरंग खरमाटे हे विनाकारण त्रास देतात. चेकपोस्टवर येणाऱ्यां प्रत्येक वाहनाला अडवून आणि त्यामध्ये काहीतरी त्रुटी शोधून जबरदस्तीने अवैध वसुली केली जाते. वाहनचालकांना धमकावणे तसेच त्यांच्याद्वारे पोलिसांकडून मारहाण करण्याचे प्रकार सुरु आहेत. तसेच आरटीओ अधिकारी रेती तस्करी करणाऱ्यां वाहनांकडून वसुली करून त्यांची वाहतूक होवू देतात. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. तसेच परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याबाबत नागपुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विविध लोकांद्वारे तक्रारी दाखल झालेल्या असताना त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. म्हणजेच बजरंग खरमाटे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने राजरोसपणे हा सर्व गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मला मिळाली आहे. तरीही या बाबत आपण स्वत: लक्ष घालून बजरंग खरमाटे व संबंधितांच्या गैरप्रकारांची तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती गडकरी यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात केली होती.

गडकरी यांनी एवढे खरमरीत पत्र लिहूनही खरमाटे यांना अभय का आणि कोणी दिले हा प्रश्न आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button