येडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या नुकताच पार पडलेल्या १५ जागांच्या पोटनिवडणुकीचा सोमवारी निकाल लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकात येडियुरप्पा सरकार राहणार की कोसळणार हे उद्या ठरणार आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेत असून आता कर्नाटकात काँग्रेस चमत्कार घडवणार का याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

कर्नाटकात उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले.

मोदींनी पुण्यातील इस्पितळात जाऊन केली अरूण शौरींच्या तब्येतीची विचारपूस

११ मतदान केंद्रांवर मतमोजणी होणार असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्यात ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीकरिता ६७.९१ टक्के मतदान झाले आहे. जुलै महिन्यात एच .डी . कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते. काँग्रेस आणि जेडीएस सरकारमधील १७ आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर कर्नाटकात बी. एस . येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजप सरकार आले. भाजपचे १०५ आमदार असून सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांना आणखी ६ आमदारांची गरज आहे. दरम्यान पोटनिवडणुकीत १५ पैकी १२ जागा या काँग्रेस आणि ३ जागा जेडीएसने लढवल्या आहेत. २२४ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेतील संख्याबळ २०८ पर्यंत कमी झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी १०५ आमदारांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला होता.