कोल्हापूर विमानतळ भूसंपादनासाठी दहा कोटींचा निधी मंजूर : ना. सतेज पाटील

Satej Patil

मुंबई : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 64 एकर जमीन संपादीत करण्यास ( भूसंपादन करण्यास) राज्य सरकारने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला दहा कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बहुमोल सहकार्यलाभल्याचे ना.पाटील यांनी सांगितले. याबाबतचा आदेश आज गुरुवारी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ना.पाटील यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारासाठी गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू आहे. विमानतळाचा विस्तार करण्यासाठी लगतची 64 एकर जमिनीची मागणी केली होती. यानुसार जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता.

या 64 एकर जमिनीच्या मोबदल्यात 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय यापूर्वी झाला होता. हा निधी राज्य सरकारने विमानतळ कंपनीकडे वर्ग करण्याचे आदेश गुरुवारी काढला. या निर्णयामुळे विमानतळाच्या विस्तारीकरणाला गती येणार आहे. सध्या कोल्हापूर विमानतळावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून 275 कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. यात धावपट्टीच्या विस्तारासह नवीन प्रशासकीय इमारत एटीआर बिल्डिंग तयार केली जात आहे. ही कामे प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण होणार आहेत.

विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाल्याने विमानतळाच्या विकासामुळे कोल्हापूर विमानतळावरून दिल्ली अहमदाबाद गोवा या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी फायदा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER