या कायद्यामुळे दोन कोटी लहान दुकानदार अडचणीत सापडणार

नागपूर : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) लागू केलेल्या नवीन कायद्यामुळे देशभरातील अंदाजे दोन कोटी लहान दुकानदार अडचणीत सापडणार आहेत. यामुळे या दुकानदारांचा १५ लाख कोटींचा व्यवसाय संपुष्टात येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आधीच लहान व्यापारी अडचणीत आले आहेत.

आता खाद्य सुरक्षा प्राधिकरणाचा नवा कायदा व महामारीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या लहान दुकानदारांना नव्या समस्यांना सामोरे जाण्याची भीती आहे. त्यामुळे अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) केंद्रीय आरोग्यमंत्री व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांना पत्र पाठवून हा नवीन कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे.भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने ४ सप्टेंबर २०२० ला अधिसूचना काढली असून त्यात खाद्य सुरक्षा आणि मानकात शाळेतील मुलांना सुरक्षित भोजन आणि संतुलित आहाराबाबत जाचक अटी लादल्या आहेत.

त्यामध्ये चरबी वाढवणारे, चिनी अथवा सोडिअमयुक्त कोणतेही सामान शाळेच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर अंतरावर विद्यार्थ्यांना विक्री करण्यास मज्जाव केला आहे. कॅटचा याला तीव्र विरोध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लोकल टू वोकल आणि आत्मनिर्भर भारताच्या केलेल्या आव्हानाचे हे उल्लंघन असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER