पुढचे पाठ, मागचे सपाट…अन् शस्त्रक्रियेचीच गरज

Jumbo Covid center

पुढचे पाठ, मागचे सपाट असा एक शब्दप्रयोग आम्ही लहानपणी ऐकायचो. त्याचा अर्थ असा होता की ताजं शिकलेलं फक्त लक्षात ठेवायचं आणि आधीचं विसरून जायचं. पण परीक्षेच्या वेळी मात्र सगळं लक्षात ठेवावं लागतं. केवळ ताजं ताजं शिकलेलं ऐन परीक्षेच्या वेळी उपयोगाचं नसतं. तसंच आजच्या काळात फक्त यू ट्यूबवरचं ज्ञान उपयोगाचं नसतं. किंबहुना यु ट्यूबवरून एखाद्या गायकाचं किंवा वादकाचं नुसतं गायन वादन ऐकून कुणी महान गायक वादक होणं जितकं अवघड तितकंच पुढचं पाठ मागचं सपाट धोरणानं करोनासारख्या प्राणघातक रोगाचा मुकाबलाही अशक्यच…

आता पुढचं पाठ आणि मागचं सपाट या शब्दप्रयोगाचा करोनाशी काय संबंध असा प्रश्न मनात येईल. पण पुण्यामधे राहणाऱ्या त्यातही पुणे महापालिकेशी ज्यांचा काही कारणानं संबंध असेल, तिथली माहिती असेल तर या संबंधाची माहिती त्यांना नक्कीच असणार. पुण्यामधे करोनाचा संसर्ग वाढत गेला आणि बघता बघता पुणं करोना रोगाच्या फैलावाच्या बाबतीत देशपातळीवर आघाडीवरचं शहर बनलंय. त्यामुळंच मग पुण्यात जम्बो कोविड सुविधा केंद्राच्या नावानं घाईघाईनं एक जम्बो नसलेली यंत्रणा उभारण्यात आली. तिथं एका पत्राकाराचा मृत्यू ओढवल्यानं आणि त्यामुळंच खूप आरडाओरडा झाल्यानं आता या जम्बो कोविड केंद्राला खरोखर जम्बो केंद्र बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं जातंय.

या साऱ्या अट्टहासामुळं पुढचं पाठ मागचं सपाट या शब्दप्रयोगाची आठवण होणं स्वाभाविक आहे. कारण वृत्तपत्रातून प्रसारित झालेल्या माहितीनुसार आणि महापालिकेच्या कारभाराची वार्तांकनं करणाऱ्या, आरोग्य विषयाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना तसंच या क्षेत्रातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनाही या गोष्टींची चांगली माहिती आहे. ती माहिती धक्कादायक आहेच पण त्याहीपेक्षा आपल्या साऱ्या यंत्रणा कशा काम करतात, हेही उघड करणारी आहे.

पुण्यामधे पाच ते सहा रुग्णालयं अशी आहेत की जी महापालिकेनं मोठ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्परूपानं सुरू करायचं ठरवलं पण प्रत्यक्षात ती सुरू झाली नाहीत किंवा एखाद्या ठिकाणी मोजक्या प्रमाणात सुरू करून बहुतांश भाग वापरातच नाही, अशीदेखील एखाद दोन ठिकाणी स्थिती आहे. म्हणजे थोडक्यात आला करोना की, करा सुरू जम्बो केंद्र पण मुळात अनेक वर्षे रेंगाळलेले, अर्धवट स्थितीत असलेल्या रुग्णालय प्रकल्पांचं काय, हे कुणीही विचारलं नाही.

गंमत बघा ही पाच सहा रुग्णालयं आहेत त्यातलं एक भारत-चीन संबंधात महत्त्वाचं नाव असलेल्या डॉ. कोटणीस यांच्या नावानं आहे. हे रुग्णालय सुरू आहे पण त्याचा पूर्ण क्षमतेनिशी वापर झालेला नाही. एक रुग्णालय कै. बिंदुमाधव ठाकरे यांच्या नावानं सुरू होणार होतं पण त्याला मुहूर्त लागलेला नाही. आता हे नाव आहे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावाचं. ते रुग्णालय होणार होतं कर्वेनगर भागात. त्याशिवाय मित्रमंडळ चौकात अनेक वर्षे रेंगाळलेला रुग्णालय प्रकल्प आहे तो तर थेट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेला आहे.

पुण्यामधे असे विविध क्षेत्रात रेंगाळलेले अनेक प्रकल्प आहेत पण बाळासाहेब ठाकरे किंवा बिंदुमाधव ठाकरे किंवा जिजामाता रुग्णालय अशा नावांचे प्रकल्पही अर्धवट रहावेत, हे त्या सर्व थोरामोठ्यांच्या नावानं सुरू केलेल्या प्रकल्पांची, त्या थोरामोठ्यांची वंचना तर आहेच पण राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचं सरकार असतानाही आणि महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही ते तसे अर्धवट राहतात, तेव्हा सर्वच पक्षांचं कर्तृत्व समोर आणणारी गोष्ट आहे.

जम्बो कोविड सेंटरच्या बाबतीत बूंद से गयी वो हौद से आती नही, हे दिसून आलेलंच आहे. करोनाकाळात पाच सहा रुग्णालये अर्धवट स्थितीत किंवा रिकामे मजले ठेवलेली किंवा नॉन स्टार्टर ठेवून जम्बो रुग्णालयांचा, जम्बो सुविधांचा अट्टहास करणं, हे म्हणजे पुढचे पाठ मागचे सपाट याचीच आठवण करून देणारं आहे. त्यामुळंच त्याचा ऐन करोना परीक्षेच्या वेळी उपयोगा होताना दिसत नाहीये. म्हणून तर म्हणावेसे वाटतेय की मलमपट्टी नव्हे तर शस्त्रक्रियेचीच गरज आहे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेला…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER