काळोखाच्या गुंफेतून मनमंदिराकडे !

काळोखाच्या गुंफेतून ... मनमंदिराकडे

‘मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ, मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल, दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ?’ कविवर्य सुधीर मोघे यांच्या ‘आत्मरंग’ कवितासंग्रहातल्या या ओळी मनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकतात.

अनेक मनोविकार आणि ग्रासलेले रुग्ण या काळोखाच्या गुंफांमध्ये वावरत असतात, सैतानाच्या हातांचा अनुभव घेत असतात. निराशेने आजारी असलेल्या लोकांचा वावर अशा काळोखी गुंफामधून तर, छिन्न मनस्कता असणारे रुग्ण सैतानाच्या हाताचा अनुभव घेत असतात. कायमस्वरूपी होणारे भ्रम आणि भास त्यांना सैतानासमानच अनुभव मिळवून देतात. उन्मादी  रुग्णाचे विचार एवढ्या वेगाने प्रवास करतात, की ते म्हणत असतात, “माझिया मना ,जरा थांब ना ! तुझे चालणे अन् मला वेदना !” तो वेग त्यांना असह्य होत असतो, दमवत असतो.

आजारांशी संबंधित अनेक मूवीज निघाल्या, अनेक पुस्तके निघाली .या सगळ्यांचा उद्देश होता आजारांबाबत जाणीव निर्माण करणे; पण कुठेतरी याचा उपयोग केवळ छोट्या छोट्या गोष्टींचे त्या त्या आजाराशी साम्य दिसले तर त्यातील साम्य शोधून लोक आता म्हणू लागले की, मला डिप्रेशन आले, खूप स्ट्रेस आहे किंवा माझा मुलगा इतका दांडगट आहे ही त्याला बहुधा एडीएचडी आहे. किंचित उपचारापर्यंत पोहचण्याचे प्रमाण वाढले. या दृष्टीने म्हणाल तर अवेअरनेस वाढला.

पण त्याहीपुढे मुळात जी गरज आहे, त्या आजारी व्यक्तींना समजून घेण्याची. ती अजूनही पूर्णत्वाला गेलेली नाही किंवा त्याचा अभावच जाणवतो. माहिती मिळाली, थोडा तडजोडीचा प्रयत्नही झाला; परंतु ती व्यक्ती काहीतरी वेगळीच आहे, असा वेगळेपणा अजूनही राखलाच जातो. त्यांना “लिंबूटिंबू’सारखे ट्रीट करणे चालूच राहते. मुख्य प्रवाहात त्यांचा अगदी सहजतेने स्वीकार केला जात नाही. कधी अति काळजी घेतली जाते तर कधी वेगळेपण जाणवेल असे कटाक्षही असतात.

व्यक्ती पूर्ण आजारी असते तेव्हा काहीतरी गंभीर आजार जसे की सिझोफ्रेनिया, मूड डिस ऑर्डर किंवा इतर नैराश्य, चिंता, ओसीडी किंवा अनेक इतर, तेव्हा तिच्यामध्ये सकारात्मक लक्षणे असतात; पण व्यक्ती पूर्ण बरी झाली असली तरीही नकारात्मक लक्षणे मात्र दीर्घ काळ राहतात. आणि हा फरक नेमका सर्वसामान्यांना कळत नाही. आजारी असतानाची गोष्ट वेगळी ! पण अजूनही ही समोरची व्यक्ती काहीतरी विचित्रच वागते, त्यावेळी त्या व्यक्तीच्या स्वभावाला, व्यक्तिमत्त्वाला, सवयींना धारेवर धरले जाते.

कुठली असतात ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लक्षणे ? पॉझिटिव्ह लक्षणांमध्ये अशा संवेदनांचा किंवा समजुतींचा  समावेश होतो की जे प्रत्यक्ष अस्तित्वात नाही. दृक, श्राव्य, चव, गंध इत्यादी बाबतीत उपस्थित नसलेल्या गोष्टी जाणवणे. उदा. नसलेला आवाज ऐकणे किंवा काही समजुती, जसे की माझे विचार चोरले जातात आहे, त्याचे विचार माझ्या माध्यमातून व्यक्त केले जात आहेत. आणि खूप सार्‍या अशा समजुती. हे सगळं सहन करणाऱ्या व्यक्तीचे दुःख तिचे तिलाच माहीत !

मग अशासारख्या तीव्र दुःखातून औषधांच्या साह्याने बाहेर येऊन ती व्यक्ती नवीन जीवनाला सुरुवात करायला बघते. परत नव्या आशेने आणि उमेदीने ! परंतु ज्याला निगेटिव्ह लक्षणे म्हणतात ती दीर्घ काळ असतात. ती अडथळा ठरतात. ती कोणती? तर कशालाही बोथट प्रतिक्रिया देणे, भाषा किंवा संप्रेषण संवादात येणाऱ्या अडचणी, तटस्थपणा, प्रेरणेचा अभाव, समाजात मिसळल्यास अडचणी येणे आणि समाजात वावरताना किंवा कुठल्याही गोष्टीचे बोधन होताना लवकर लक्षात न येणे. थोडक्यात नॉर्मल मानसिक कार्यांचा अभाव किंवा कमतरता. यात विचार, वर्तन, गृहीतक यांचा समावेश होतो. व्यक्ती कुठलीही गोष्ट फार काळ एन्जॉय करू शकत नाही. पण याची माहिती सर्वसामान्यांना नसते.

म्हणूनच एवढ्या कठीण आजारातून उठलेला माणूस तेव्हा ‘ऑड मॅन आउट’ ठरतो, तेव्हा तो अतिशय दुःखी होतो. कारण तो आता आजारी नसतो. मुख्य समाजप्रवाहात आलेलाही असतो. परंतु त्यात वावरण्याइतका मानसिक सुदृढ मात्र झालेला नसतो. दुसरी अडचण म्हणजे आता त्याला स्वविषयक भान आलेले असते . त्याला स्वतःचं अस्तित्व, एका मानव प्राण्याला हवाहवासा वाटणारा स्व आदर , स्वीकार हवासा वाटत असतो.

पण अशा परिस्थितीत तो तळ्यातही  नसतो आणि ना मळ्यातही ! आणि समाजव्यवस्थेत परत रुजण्याची त्याची केविलवाणी धडपड चालू असतानाच तथाकथित नॉर्मल समजल्या जाणाऱ्या लोकांना तोंड द्यायचं असतं. त्यांना सहानुभूतीची गरज मुळीच नसते तर त्यांना गरज असते ती समजून घेण्याची!

ही बातमी पण वाचा : “पालकत्वाच्या पाऊलखुणा, मराठी साहित्याच्या अंगणा !”

ग्रुपमध्ये वावरत असताना पटापट निर्णय घेणे, कोलाहलात संवाद साधणे, इतरांशी योग्य संप्रेषण साधणे कठीण जाते. बरेचदा विषय काय चालू आहे  याचे  आकलन लवकर होत नाही. कुठल्याही गोष्टीचा आनंद पूर्णपणे लुटू शकत नाही. प्रेरणेची कमतरता असल्याने ग्रुपमध्ये या व्यक्ती उत्साहाच्या बाबतीतही मागे पडतात. मनात सुरू असणाऱ्या कोलाहलाने त्या प्रचंड दमलेल्या असतात. या मनाच्या व्यग्रतेने आलेल्या थकव्याने त्यांना एकटे राहायला, शांत बसायला आवडते. त्यांना स्वतःला आता आपण नॉर्मलपेक्षा कुठे वेगळे पडतो हे कळायला लागत असल्याने न्यूनत्वाची भावना वाढीस लागते. भावनांच्या तटस्थतेमुळे ते भरभरून कुणावर प्रेम, माया करू शकत नाही.

एकूणच स्वतःचे आयुष्य मॅनेज करायला त्यांना कठीण होत असल्याने त्या स्ट्रगलमध्ये या आजारातून बाहेर आलेल्या व्यक्ती गुंतलेल्या असतात. “प्रॉब्लेमच आहे बाई तिला काहीतरी ! फारच विचित्र वागणं असतं पाहा !” असे उद्गार ऐकायला येतात . तेव्हा अशा व्यक्तींना विचारावंसं वाटतं की, “कळतंय ना प्रॉब्लेम आहे, मग तुमची बुद्धिमत्ता कुठे वाया जाते ? घ्या ना त्यांना थोडं समजून !” मानसिक रुग्णांसाठी वापरात येणारे समानार्थी शब्द हे  प्रचंड अपमानकारक असतात.

आज विज्ञान एवढे  पुढे गेले, आजारामागची कारणे कळतात आहे तरी, त्या व्यक्तीला काळोखाच्या गुंफेतच खितपत का पडावे लागते ?

अशा लोकांना फक्त मोटिवेशनची आणि प्रशंसेची थाप खूप हवी असते. “खूपच छान दिसतेस गं  तू, हा ड्रेसचा रंग अगदी खुलतो तुला !” किंवा “वा ! एकदम फ्रेश आणि एव्हरग्रीन !” असे शब्द त्यांना खूप उभारी देतात याचा कित्येकदा अनुभव घेतलाय मी ! आणि त्यामुळे मग त्यांना आपण इतके प्रिय होतो की, “मॅडम मी यावेळी घरी नवरात्र बसवलं आणि पूर्ण एकटीनं  पूर्ण केलं. ” किंवा “मी आता दररोज लवकर उठून आंघोळ करून वडिलांबरोबर नियमित कंपनीत जातो मॅडम!” असं जेव्हा ते उत्साहाने सांगतात  तेव्हा त्यांच्या छोट्या छोट्या अचीवमेंट्सचा आनंद ते आपल्याबरोबर शेअर करतात.

थोडक्यात काय, तर ते एकदम किल्ले चढणार नसतात, तर त्याच्या पायऱ्या चढायला सुरुवात मात्र झालेली असते. तिथे त्यांना गरज असते तुमची आणि आमची ! तरच ते काळोखाच्या गुंफेतून बाहेर पडून मनाच्या प्रसन्न अशा मंदिराकडे वाटचाल सुरू करतील. जेथे असतील पवित्रता ,समृद्धी, सुख-शांती आणि समाधान यांच्या पायऱ्या. आणि जेव्हा मंदिरात प्रत्यक्ष पावले पडतील तेव्हा शब्द उमटतील, “मन मंदिरा तेजाने उजळून घेई साधका, संवेदना, संवादे सहवेदना जपताना !” आणि मग तेथे नसेल भेदभाव, नसेल टीका, तर सहवेदनेने जपलेल्या संवेदना, उत्तम संवाद घडवून आणून सगळी दरी मिटवतील हे नक्की !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशन व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER