विरोधकांकडून रडीचा डाव, माझ्या नावाचा गैरवापर करत प्रचार, सुप्रिया सुळेंचा आरोप

Supriya Sule

मुंबई :- महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या बनावट आवाजाची एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्या ऑडिओ क्लिपमुळे मोठा गदारोळ झाला आहे. त्या ऑडिओ क्लिपमधून सुप्रिया सुळे (Supriya Sule) महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांविरोधात प्रचार करत असल्याचं समोर आलं आहे. त्यावरच आता फेसबुक लाइव्ह करून सुप्रिया सुळेंनी खुलासा केला.

फेसबुक लाइव्हमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या प्रचारात आमच्या विरोधकांकडून लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात रडीचा डाव सुरू आहे. काही लोकांनी माझ्या नावाचा आणि चुकाचा मोबाईल क्रमांक माझा असल्याचे भासवत प्रचार सुरू केला आहे. त्यासाठी फेक अकांऊंट देखील उघडण्यात आले असून या गंभीर प्रकाराची मी निवडणूक आयोगाशी देखील संपर्क साधला आहे. या संदर्भात पोलिसांची देखील मदत घेतली जात आहे, असा खुलासा सुप्रिया सुळे यांनी केला.

“मला काही सहकाऱ्यांचा आणि चॅनेलमधून फोन आले. उस्मानाबाद आणि लातूरच्या काही भागामध्ये माझ्या आवाजाचा आणि खोटा मोबाईल नंबर वापरून आणि लिहून काही लोक प्रचार करत आहेत. त्याचा गैरवापर होत आहे. हे खरंच दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात इतकी पातळी सोडून आज आमचे विरोधक प्रचार करत आहेत. मी तातडीनं पोलीस यंत्रणेची मदत घेतलेली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाशीही संपर्क साधलेला आहे. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण (Satish Chavan) म्हणून उमेदवार आहेत, यांनाही मी तातडीनं संपर्क साधलेला आहे. विरोधक जो काही रडीचा डाव खेळत आहेत, तो दुर्दैवी आहे. पदवीधरची ही निवडणूक आहे, औरंगाबादचे आमचे उमेदवार आहेत. कुठलाच विषय राहिला नाही म्हणून विरोधक इतकी पातळी सोडून माझ्या नावाचा गैरवापर करून एक फेक अकाऊंट, फेक नंबर वापरून आज ते प्रचार करत आहेत.

अशा प्रकारे चुकीचा आणि खोटा प्रचार करणाऱ्यांना शिक्षा देखील झालीच पाहिजे. अशा पातळी सोडून खोटा प्रचार करणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करते. कृपा करून कुणीही अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, हे सांगण्यासाठी मी हे फेसबुक लाईव्ह केले आहे. माझा पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांची खोटी बदनामी करू नका, तुमच्याकडे काही विषय नसतील तर गप्प राहा, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना सुनावले.

ही बातमी पण वाचा : लोकसभेच्या सदस्या असूनही सुप्रिया सुळेंचे पंतप्रधान मोदींबद्दल केलेले  वक्तव्य बालिश :  गोपीचंद पडळकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER