मित्रांची मस्करी तरुणाच्या जीवावर बेतली, गळा चिरुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Suicide

मुंबई :- ‘तुझ्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन आता तुला फाशी होणार’, अशी मस्करी मित्रांकडून एका तरुणासोबत करण्यात आली. मात्र याप्रकाराने तो इतका घाबरला की त्याने स्वतःचा गळाच चिरुन घेतला. याप्रकरणी दहिसर पोलीस चौकशी करत असुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

शेरबहादूर सिंग (३२) असे या तरुणाचे नाव आहे. तो मुळचा नेपाळचा रहिवासी असुन दहिसरमध्ये एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणुन काम करतो. दोन दिवसांपूर्वी त्याच्या काही मित्रांनी त्याच्याशी मस्करी करत पोलीस ठाण्यात तुझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे आता पोलीस तुला पकडणार आणि फासावर लटकवणार असे सांगितले. त्यावेळी घाबरलेल्या सिंगने दारूच्या नशेत जवळच असलेल्या पानाच्या दुकानातील एक चाकू उचलला आणि तो स्वतःच्या गळ्यावर फिरवला. दहिसर पेट्रोलपंपजवळ एस व्ही रोड येथील वर्धमान इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात हा प्रकार घडला. त्यामुळे आसपासच्या लोकांनी स्वतःचे मोबाईल काढत रक्तबंबाळ झालेल्या सिंगचे फोटो काढण्यास आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सुरवात केली. मात्र त्यातल्या एकानेही त्याला रुग्णालयात दाखल करण्याची तसदी घेतली नाही. अखेर याप्रकरणी पोलीस नियंत्रण कक्षावर फोन करण्यात आला आणि दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला स्थानीक रुग्णालयात दाखल करविले असुन त्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी अद्याप।गुन्हा दाखल करण्यात आला नसुन पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. मात्र सिंगला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या प्रकारात तथ्य असेल तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलीस सुत्रांचे म्हणणे आहे.

ही बातमी पण वाचा : क्रिकेटपटू चंद्रशेखर यांची आत्महत्याच!