पेटत्या कारमधून उडी घेत बचावला फ्रेंच मोटार रेसर रोमेन ग्रोजान

French motor racer Romain Grozan

बहारीन- फ्रान्सचा (France) आणि हास (Haas) एफ वन (F1) टीमचा मोटाररेसिंगपटू रोमेन ग्रोजान (Romain Grosjean) हा फाॕर्म्युला वनच्या बहारीन ग्रँड प्रिक्स(Baharin grand prix) स्पर्धेतील एका भयानक अपघातात अगदी बालंबाल बचावला. स्पर्धेच्या पहिल्याच लॕपमध्ये ही दूर्घटना घडली.

त्यात ग्रोजानची कार भर वेगात ट्रॕक सोडून कडेला असलेल्या अडथळ्यांना जोरात धडकली आणि क्षणार्धात कारने पेट घेतला. त्यात कारच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट झाला. यादरम्यान ज्वाळांच्या लोळातून अगदी अविश्नसनीयरित्या ग्रोजेन बाहेर आला आणि तेथे धावलेल्या मार्शल्सनी त्याला त्वरेने सुरक्षित स्थळी हलवले. हा अपघात एवढा भयानक होता की त्यात ग्रोजानच्या कारचे अक्षरशः दोन तुकडे झाले.

या दूर्घटनेत रोमेन बचावला असला तरी तो किरकोळ भाजला आहे आणि त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत. आपण सुरक्षीत व व्यवस्थीत असल्याचा एक व्हिडीओ संदेशच त्याने जारी केला आहे. त्याचा संघ हासने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की रोमेन सुरक्षित आहे पण त्याच्या हातांना आणि पायाच्या घोट्याला किरकोळ भाजले आहे.

या अतिशय भयानक दूर्घटनेत ज्यापध्दतीने ग्रोजान बचावला ते चमत्काराच्या कमी नाही अशी प्रतिक्रिया मोटार रेसिंगच्या क्षेत्रातून उमटली आहे. 34 वर्षीय ग्रोजान हा जन्माने स्वीत्झर्लंडचा असला तरी तो फ्रेंच ध्वजाखाली खेळतो.

पहिल्या लॕपच्या तिसऱ्या वळणावर ग्रोजानच्या कारची दानील किवॕटच्या कारशी धडक झाली आणि त्याची हास कार ट्रॕक सोडून थेट बाजूच्या अडथळ्याच्या भींतीवर धडकली. धडक एवढी जोरात होती की, लगेच त्याच्या कारचे दोन तुकडे झाले. क्षणार्धात कार पेटली आणि आगीचे लोळ उठले. यातून बचावणे कठीण आहे असे वाटत असतानाच रोमेन ज्वालांनी घेरलेल्या स्थितीत कारच्या बाहेर पडला आणि मदतीसाठी धावलेल्या मार्शल्सनी त्याला त्वरेने सुरक्षितस्थळी हलवले. या थरारात जवळपास अर्धामिनीटच रोमेन ग्रोजान ज्वालांनी घेरलेल्या स्थितीत अडकलेला होता. इंधनाची टाकी फूटल्याने आग फार वेगाने भडकली होती.

त्याच हास संघाचे प्रमुख गुंथर स्टेनर यांनी म्हटले आहे की अतिशय युध्दपातळीवर बचाव कार्य करणाऱ्या बचाव चमूला मी धन्यवाद देतो. तेथील मार्शल्स व एफआयएच्या मेडीकल टीमच्या लोकांनी फार मोठे काम केले आहे पण ही फारच भीतीदायक दूर्घटना होती. या बचाव कार्यात स्वतः चा जीव धोक्यात घालून पुढे राहिलेले एफआयएच्या मेडीकल कारचे अॕलन व्हॕन डर मर्व् यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असुन त्यांचे हिरो असे वर्णन केले जात आहे.

यानंतर शर्यत काही काळ थांबविण्यात आली होती. त्यानंतर ही शर्यत पूर्ण करण्यात आली आणि आधीच विश्वविजेतेपद निश्चित केलेल्या ब्रिटीश रेसर लुईस हॕमिल्टनने ही शर्यत जिंकली.

या दूर्घटनेबद्दल हॕमिल्टनने म्हटले आहे की, रोमेन सुरक्षित आहे यासाठी देवाचे आभार. या खेळासाठी आम्ही जे धोके पत्करतो ते म्हणजे काही गंमत नाही. आम्ही आमच्या जीवाची बाजी लावतो. एफआयएने रेसिंगपटूंच्या सुरक्षेसाठी जे काम केले आहे त्यासाठी त्यांनाही धन्यवाद द्यायला हवेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER