
धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. दरम्यान, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील व्यंकटेश लॉन्स येथे सुरू असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दोन गटांमध्ये तुफान वाद झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जयंत पाटील कार्यक्रमासाठी आले असतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली ही फ्रीस्टाईल हाणामारी सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संवाद यात्रेच्या निमित्ताने धुळे येथे होते. त्यानिमित्त झालेल्या मेळाव्यात अनिल गोटे यांचे समर्थक असलेले भूषण पाटील हे भाषणासाठी उभे राहीले असताना त्यांचे कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादास सुरुवात झाली. थोड्या वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि प्रदेशाध्यक्षांसमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले.
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील या कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या हाणामारीबाबत विचारणा केली असता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर कार्यकर्त्यामध्ये काही गोष्टींमुळे नाराजी असल्याने त्यांनी आपल्या मनातील राग यावेळी व्यक्त केला, अशी सारवासारव इतर नेत्यांनी केली. मात्र ही हाणामारी नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे कळू शकलेले नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला