मॉल व मल्टीप्लेक्समध्ये मोफत पार्किंग द्या –नगरसेवक मनोहर डुंबरे

ठाणे (प्रतिनिधी) : पुणे आणि नाशिक महापालीकेने शहर विकास नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी केल्याने शहरातील मॉल व मल्टीप्लेक्समध्ये नागरिकांना मोफत पार्किंगची सुविधा मिळाली. त्याच धर्तीवर ठाणे शहरातील मॉल व मल्टीप्लेक्समध्ये मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी महापौर मीनाक्षी शिंदे आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले आहे.

शहर विकास नियंत्रण नियमावलीनुसार व्यावसायिक इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था करून मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणे संबंधित व्यावसायिकांना बंधनकारक आहे. मात्र, या नियमाला हरताळ फासत ठाणे शहरातील मॉल्स-मल्टीप्लेक्समध्ये नागरिकांना चारचाकी वाहने व दुचाकींसाठी स्वतंत्र पार्किंग शुल्क आकारले जात आहे. याउलट पुणे शहरात पार्किंगप्रश्‍न बिकट झाल्यावर आठ दिवसांपूर्वी नागरिकासाठी सर्व मॉल्समध्ये मोफत पार्किंग उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने ठराव मंजूर करत पालिकेच्या विधी व न्याय विभागाच्या अभिप्राय घेत या ठरावाची अमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. या ठरावाच्या अंमलबजावणीबाबत मॉल व्यवस्थापनाने टाळाटाळ करताच पालिकेने या मॉल मल्टीप्लेक्सला नोटीसा बजाविल्या होत्या. या नोटीसांनंतर शहरातील मॉलमध्ये मोफत पार्किंगची अंमलबजावणी सुरू झाली. पुण्यानंतर नाशिक महापालिकेने देखील ठराव करुन मॉलमध्ये मोफत पार्किंग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान

पुणे व नाशिकप्रमाणेच ठाणे शहरातील पार्किंगचा प्रश्न सुद्धा जटील झाला आहे. मुख्य शहराबरोबरच मॉलच्या परिसरात पार्किंग केल्या जाणार्या वाहनांमुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असून या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा नाहक वेळ वाया जात आहे. म्हणूनच ठाणे शहरात देखील मॉल व मल्टीप्लेक्समध्ये मोफत पार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी डुंबरे यांची मागणी आहे.

ठाणे शहरात असलेल्या पाच मोठ्या मॉलमध्ये पार्किंगसाठी दहा रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. हे शुल्क बेकायदेशीर असून या प्रकरणी महापालिकेने तातडीने ठराव मंजूर करुन शहरातील वाहन चालकाची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मॉल व मल्टीप्लेक्समध्ये निशूल्क पार्किंग सुरु करण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली असून याबाबतचे निवेदन त्यांनी महापौर आणि आयुक्तांना दिले आहे.