गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा

सासू-सून

मुलाचे नुकतेच लग्न (Marriage) झालेले.पाच सहा महिन्यानंतर शामल मुलाकडे दुसऱ्यांदा जात होती. सुरुवातीला जाऊन तीन चार दिवस राहून तिने थोडी घडी बसवली. लग्न ठरल्यावरच दिले घर लावून दिले होते. पण मध्ये आता बरेच महिने झाले म्हणून ती गेली. तसेही घरी तिचे सासू-सासरे इतर व्याप त्यामुळे तिला सहज निघणे शक्य नसायचं. त्यामुळे मुलगा आणि सुनेला ही आनंद झाला. गप्पागोष्टी झाल्या. ब्रेकफास्ट झाला. मुलगा भाजी आणायला निघाला. लिस्ट द्या म्हणून मागत होता. नेहमीच्या सवयीने शामलने कांदे बटाटे मिरच्या ….सांगायला सुरुवात केली. तिच्याकडे अजूनही भाजीची लिस्ट करायला बसली, की सासूबाई सासरे, सगळेच यादीत वस्तू सांगायचे आणि ती लिहायची. तेवढ्यात मुलाने सुनेला विचारले, “सांग ग काय आणायचे?” आई आम्ही बटाटे वगैरे काही खात नसतो. (नव्या पिढीचा अति हेल्थ कॉन्शसनेस). ती एकदम चूप झाली. मनातल्या मनात तीने स्वतःला सांगितलं, आता मध्ये बोलायचं नसतं. मुले मोठी झालीत, मोठे मोठे निर्णय त्यांना घेता येतात, तू काय कांदे-बटाटे सांगायला लागलीस! पण आत तीचं मन नक्कीच रडल होत.

आतापर्यंत आपला म्हणवला जाणारा मुलगा आणि सून नव्याने स्वतंत्र घराची धुरा सांभाळायला लागतात, तेव्हा नकळत एक शल्य, मुलांच्या आयुष्यातून वजा झाल्याची भावना निर्माण होते.

ही बातमी पण वाचा : ‘तो’ समजून घेताना…

हेच सगळं आयुष्यातील सगळ्या महत्त्वाच्या निकटच्या नात्यांमध्ये होतं. चांगले मित्र व मैत्रिणी, पती-पत्नी, एवढेच काय एखाद्या संस्थेसाठी अनेक वर्षांपासून आपण आपुलकीने काम केल्यावर, पुढचे येणारे पदाधिकारी पूर्ण आधीचे प्रोजेक्ट बंद करून, नवीन काही योजना आखतात. अशावेळी मन दुखावत. याचं खूप छान उदाहरण आठवतं. मध्यंतरी “होणार सुन मी या घरची “सिरीयल लॉक डाऊन मुळे परत दाखवली गेली. त्यातील आई आजी हे जे पात्र आहे, त्या गोखले ग्रुप उद्योगाच्या संस्थापक व संवर्धक असतात. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचा नातू श्रीरंग कारभार चालवतो. सिरीयल मध्ये आई आजींचा श्री अत्यंत लाडका दाखवला आहे. पण त्या स्वतः कार्यक्षम, खंबीर, उत्तम उद्योजिका म्हणून त्यांच्या कारकीर्दीत प्रसिद्ध असतात. मात्र श्री ची कामाची पद्धती वेगळी आहे. स्मार्ट वर्क तो करतो. हे बघून त्यांना थोडा त्रास होतो. अर्थात संयत व्यक्तिमत्त्व असणारी त्यांची भूमिका दाखवली असल्याने हा विरोधाभास फक्त विविध प्रसंगातून जाणवत राहतो.

आपल्या मूळ गावातली, आपली राहती वास्तु सोडून जेव्हा सीनियर सिटीजन मुला-मुलींनी कडे शिफ्ट होतात, किंवा बरेचदा राहत्या घरांचे अपार्टमेंट करण्याकडे अलीकडे सगळ्यांचा कल आहे! परंतु मुळात तिथे घरात राहिलेल्या त्या वास्तूशी अतूट नातं जुळलेलं असतं. ते तुटता तुटत नाही तेव्हाही असा त्रास त्यांना होतो.

वरील सर्वच घटनांमध्ये कुठेतरी ‘इगो हर्ट’ होत असतो का ? असाही प्रश्न पडतो. एवढेच काय पती-पत्नीच्या नात्यामध्ये सुद्धा जेव्हा ती किंवा तो घरासाठी जीव ओतून काम करतो/करते. पण त्याची साधी दखलही घेतली जात नसेल तर अपेक्षाभंगाचे दुःख होऊन तुटलेपण येतं. एखादी मुलगी, घरची परिस्थिती ठीक नसल्याने खंबीर पणे स्वतः अविवाहीत राहून भावंडांना शिक्षण देऊन मोठे करते, त्यांना नोकऱ्या मिळवून त्यांच्या लग्नापर्यंत कर्तव्य करते. तिच्या कष्टाचे दोन प्रेमळ शब्द तरी तिला मिळावे असं तिला वाटतं, नाहीतर तुटलेपण येणारच!

सेवानिवृत्तीनंतरही हा अनुभव अनेक पुरुष व स्त्रियांना येतो. एकतर इतक्या दिवसांची सवय, जबाबदाऱ्या आणि त्यांच्या बरोबर येणारे अधिकार अचानक हरवतात.

अशावेळी खूपच गरज असते डिटॅचमेंटची. थोड्या अलिप्ततेची ! बरेचदा असं होतं की आपण अलिप्त व्हायला गेलो की नकळत नैराश्य यायला लागते. डिप्रेस, एकाकी वाटायला लागते.याला कारण आपला दृष्टिकोन आणि आपल्याला विलगता कळलेली नसते आणि जमत नसतेच. हा समतोल शोधण्यासाठी मुळात भावनिक विलगता म्हणजे काय ?

हे समजून घ्यायला लागतं. भावनिक विलगता म्हणजे विरक्ती नाही. नियंत्रण सोडून देणे ही नाही आणि भावना गोठवणे किंवा भावनेची बधिरता तर नाहीच नाही. भावनिक गुंतवणूक, जोडलेले असणे हे खरचं खुप उबदार असते, आनंद देणारे असते. पण जेव्हा भावनिक गुंतवणुकीचा अट्टाहास होतो, अकारण सल्ले, ढवळाढवळ आणि आपलं स्वतःचं म्हणणं हट्टाने पकडून धरणे, होते त्यावेळी आपली व समोरच्याची ही भावनिक पडझड होते.

खरं बघितलं तर नवीन पिढी स्वार्थी, अप्पलपोटी नसते. त्यांच डावलणही मुद्दाम नसतच. वेगळा असतो तो फक्त त्यांचा दृष्टिकोन. कदाचित जास्त योग्य असू शकतो. सक्षम असू शकतो. जे काम स्मार्टवर्क ने होते त्यासाठी आम्ही करायचो म्हणून हार्डवर्क करायची प्रत्येकच वेळी गरज नसते.

अजून एक गोष्ट म्हणजे या भावनिक गुंतवणुकीत वयानुरूप विकासात,आयुष्यात केंद्रस्थानी असणारी (focus) व्यक्ती बदलत जाते. सुरुवातीला आई बाबा, आजी आजोबा या विश्वातून पुढे तरुण मित्र-मैत्रिणींचा ओढा आणि नंतर पुढे आयुष्याचा जोडीदार असे केंद्र बदलत जातात आणि जाणार आहेत. ते नैसर्गिक आहे हे समजून घेतलं, तर आपण डोळसपणे भावनिक विलगता स्वीकारू शकतो.

अशावेळी आपण गाडीचे ड्रायव्हर नसूही कदाचित, चालक नसू पण वाहक तर असू, नाहीतर कदाचित फक्त प्रवासी तर निश्चितच असू. आणि हा प्रवास एन्जॉय करता यायला हवा असेल आणि आपल्या सह प्रवाश्यानाही तो सुखकारक व्हायला हवा असेल तर असा विचार करून मनाला क्लेश करून घेणे योग्य नाही. आणि निकटवर्तीयांचा वयानुरूप फोकस कुठेही असेल पण अशी बरीच जनता आहे की ज्यांना कुणाच्यातरी भावनिक गुंतवणुकीची गरज आहे तर तो आनंदमार्ग आपण धरू शकतो. सुरेश भट यांची एक गझल आहे. त्यातील दोन ओळी मला आठवतात. त्याप्रमाणे विलगता पण प्रेमपूर्वक आपल्याला साधता येते. समजून घेऊन आत्मसात करता येते.”रंगात रंगून साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा वेगळा !”

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER