फसव्या जाहिरातीने ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर’ची पुरती जिरली!

Consumer fourm

Ajit Gogateकेरळच्या त्रिचूर जिल्ह्यातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने (District Consumer Forum) केसांना लावायच्या एका क्रीमची खोटा दावा करणारी जाहीरात केल्याबद्दल तेथील एका प्रथितयश चित्रपट अभिनेत्याला दंड करून भविष्यवेधी व पथदर्शी असा निकाल दिला आहे. देशात ग्राहक न्यायालयाने दिलेला अशा प्रकारचा हा पहिलाच निकाल आहे. तो भविष्यवेधी अशासाठी की तो काळाच्या पुढे जाऊन दिलेला आहे. आधीचा कायदा रद्द करून केंद्र सरकारने गेल्या वर्षी सुधारित ग्राहक संरक्षण कायदा केला. त्यात उत्पादनाच्या फसव्या व अतिरंजित दावा करणाऱ्या जाहिरातींबद्दल उत्पादक, वितरक व विक्रेत्याखेरीज ती जाहिरात करणाºया ‘सेलिब्रिटी’लाही जबाबदार धरण्याची तरतूद आहे. केरळमधील हा निकाल ज्या प्रकरणात दिला गेला ते कायद्यातील ही नवी तरतूद लागू होण्याच्या आधीची आहे.

हा निकाल केरळमध्ये खूप लोकप्रिय. असलेल्या ‘धात्री हेअर क्रीम’च्या जाहिरातीच्या संदर्भात दिला गेला आहे. दृक््श्राव्य माध्यमंतील ती जाहिरात मल्याळी सिने अभिनेता अनूप मेनन याने केलेली होती. हे क्रीम डोक्याला लावल्याने दोन आठवड्यांत केसांची भरघोस वाढ होऊन ते काळेभोर होतील, असे आमिष ग्राहकांना त्या जाहिरातीतून दाखविले गेले होते. जाहिरातीला भुलून फ्राान्सिस वडक्कन या ग्राहकाने ३५६ रुपयांना एक डबी या दराने हे क्रीम घेऊन ते कित्येक महिने वापरले. पण काळेभोर, भरघोस केस सोडून त्यांच्या डोक्याला घोर फसवणुकीचा ताप झाला. त्यांनी मे. धरित्री आयुर्वेद प्रा. लि. ही उत्पादक कंपनी, क्रीमची जाहिरात करणारे अभिनेता अनूप मेनन व क्रीम जेथून खरेदी केले त्या मेडिकल स्टोअरविरुद्ध ग्राहक न्यायालयात फिर्याद दाखल केली.

अध्यक्ष सी. टी. साबू व सदस्य डॉ. के. राधाकृष्णन नायर आणि श्रीजा एस. यांचा समावेश असलेल्या जिल्हा मंचाच्या न्यायपीठाने खोटे आमिष दाखविल्याबद्दल कंपनी, विक्रेता व जाहिरात करणारा ‘सेलिब्रिटी’ अशा तिघांना दोषी धरले. फसवणूक केल्याबद्दल कंपनी व  जाहिरात सादर करणाºया‘सेलिब्रिटी’ने प्रत्येकी १० हजार रुपये व क्रीम विकणाºया दुकानदाराने तीन हजार रुपये ग्राहक फ्रान्सिस वडक्कन यांना भरपाईपोटी द्यावे, असा आदेश देण्यात आला. वडक्कन यांनी पाच लाख रुपयांच्या भरपाईची महत्वाकांक्षी मागणी केली होती. पण मंजूर झालेली रक्कम महत्वाची नाही तर फसवणुकीबद्दल जाहिरात करणाऱ्या ‘सेलिब्रिटी’लाही जबाबदार धरण्याचे न्यायतत्व प्रस्थापित झाले हे ग्राहक सबलीकरणाच्या दृष्टीन महत्वाचे आहे.

दोषीपणाचा शिक्का बसला असला तरी, आपल्याकडून चूक झाली याची जाणीव झाल्यावर, अभिनेता मेनन याने न्यायालयात जी प्रांजळ आणि प्रामाणिक भूमिका घेतली तिलाही दाद द्यावी लागेल. क्रीमच्या डबीच्या खोक्यावर ते कसे वापरावे याच्या सविस्तर सूचना छापलेल्या होत्या. वडक्कन यांनी त्यांचे पालन केले नाही म्हणून त्यांना क्रीम वापरूनही गुण आला नाही, असा लबाडीचा युक्तिवाद कंपनीने केला. परंतु तो फेटाळताना ग्राहक मंचाने म्हटले की, कंपनीचा अंतस्थ हेतू स्वच्छ नाही. कारण खोक्यावर छापलेल्या सूचना एवढ्या बारीक अक्षरात आहेत की भिंग घेऊनही त्या वाचता येत नाहीत! अभिनेता मेनन याने मात्र साक्षीत सांगितले की,  माझ्या आईने घरी तयार केलेल्या तेलाशिवाय मी आयुष्यात केसांना दुसरे काही लावत नाही. त्यामुळे या क्रीमने खरंच केस वाढतात की नाही याचा मला काही अनुभव नाही. लिहून दिलेल्या मजकुराच्या खरेपणाची शहानिशा न करता जाहिरातीत मी फक्त त्याची पोपटपंजी केली!

‘पुढच्यास ठेंच, मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे मेननच्या या अनुभवातून, केवळ रग्गड पैसा मिळतो म्हणून, उठसूठ कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करणारे इतर ‘सेलिब्रिटी’ सावध झाले तरी वडक्कन यांना पैशाहून अधिक मोलाची भरपाई मिळाली, असे म्हणता येईल

अजित गोगटे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER