शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने पावणेदोन कोटींची फसवणूक

Stock market

कोल्हापूर : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने पावणेदोन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईस्थित कंपनीतील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पांडुरंग बाळासाहेब पाटील (वय 39, रा. सादळे, ता. करवीर) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली. हा गुन्हा मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.

याप्रकरणी समीर जोशी, सुरेश पवार, जैसन रॉड्रिक, प्रेम चौधरी, अभिजित दुधवडकर (सर्व रा. मुंबई ) या संशयितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. मुंबईचे रहिवासी असलेले संशयित जोशी, पवार, रॉड्रिक, चौधरी व दुधवडकर यांनी टेक प्रॉफिट नावाची कंपनी सुरू केली होती. शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देऊ, अशी जाहिरात फिर्यादी पाटील यांनी पाहिली होती. यानंतर त्यांनी मुंबईतील कंपनीशी संपर्क साधला. मुंबई कार्यालयात जाऊन त्यांनी स्वत:ची 18 लाखांची रक्कमही गुंतवली. तसेच आपल्या काही मित्रांचीही रक्कम कंपनीला दिली.

कंपनीने गुंतवणूकदारांना एक ऑनलाईन अॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले. त्यांना सुरुवातीला चांगला परतावा मिळवून देण्यात आला. कंपनीने आणखी काही गुंतवणूकदारांकडूनही पैसे घेतले. ही रक्कम तब्बल 1 कोटी 75 लाख 14 हजार रुपयांची आहे. कंपनीने सप्टेंबर 2019 ते 20 ऑक्टोबर 2020 कालावधीत ही रक्कम जमवली. पण यानंतर त्यांनी गुंतवणूकदारांना परतावा दिला नाही. याबाबत गुंतवणूकदारांनी पोलिसांत फिर्याद दिल्याने संबंधित कंपनीच्या पाचही संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER