सलमान खानच्या नावाने फसवणूक

Fraud in the name of Salman Khan

पुणे (प्रतिनिधी) :- बॉलिवुडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खानच्या आगामी किक-2 चित्रपटात एका महिलेला सहाय्यक भूमिका देण्याचे व तिच्या भावाला सहाय्यक दिग्दर्शकाचे काम देण्याचा बहाणा करुन एक लाख 82 हजार सहाशे रुपयांची फसवणूक केल्याची घटना पुण्यात घडली आहे. हिरल ठक्कर आणि अमर वुटला यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध या प्रकरणी वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वारजे माळवाडीच्या 44 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.

ही बातमी पण वाचा : मुलगी बनून करत होता मुंबई, पुण्यातील व्यापाऱ्यांची फसवणूक…

हा प्रकार 15 जून ते 6 ऑगस्ट 2019 दरम्यान घडल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी या बाबत सांगितले की, सलमान खानचा किक-2 हा चित्रपट येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या अनुषंगाने फिर्यादी महिलेला जूनमध्ये एक फोन आला़. फोन करणाऱ्याने त्यांना, आपण सलमान खानच्या चित्रपटासाठी कास्टिंग करत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. संबंधित महिलेला सहायक भूमिका देण्याचे तसेच तिच्या भावाला सहायक दिग्दर्शक म्हणून काम मिळवून देतो, असे सांगितले. त्यानंतर त्यांच्याशी आणखी दोघांनी संपर्क साधून वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून 1 लाख 82 हजार 600 रुपये बॅंक खात्यात भरण्यास लावले. त्यानंतर संबंधित फोनच बंद झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधला. तिथे गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिक तपासासाठी तो वारजे माळवाडी पोलिसांकडे आला आहे.