कृष्णवर्णी खेळाडूंनी यशस्वी ठरु नये अशी काही लोकांची इच्छा- अमेरिकन टेनिसपटूचा आरोप

Frances Tiafoe

कृष्णवर्णी फ्रान्सिस टिफो हा अमेरिकेच्या सफल टेनिसपटूंपैकी एक आहे मात्र अमेरिकेतील विविधतेच्या अभावाने त्याला तो कुणीतरी वेगळाच आणि बाहेरचा असल्याचे वाटते. जागतिक क्रमवारीत 81 व्या स्थानी असलेल्या या खेळाडूने 2019 च्या ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

टेनिसच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील टॉप-100 मध्ये स्थान मिळविलेल्या मोजक्याच कृष्णवर्णी खेळाडूंपैकी तो एक आहे. मात्र या स्तरावर पोहोचण्यासाठी आपल्याला इतरांपेक्षा दुप्पट कष्ट उपसावे लागले असे तो सांगतो. आपल्या वर्णावरुन आलेल्या कटू अनुभवांवरुन हा खेळाडू सांगतो की, मी यशस्वी व्हावे असे काही जणांना वाटतच नव्हते. मला सारखे असे वाटत राहिले की कुणाच्यातरी वाट्याचे मी काही घेत आहे. आम्ही सामर्थ्यशाली व्हावे असे काही लोकांना वाटतंच नाही त्यामुळे मला तसे वाटत होते याची मला खात्री आहे.

ही बातमी पण वाचा : ‘त्यांना जेलमध्ये टाका’ म्हणणारा अमेरिकी टेनिसपटू होतोय ट्रोल

त्याने इतर व्यावसायिक खेळाडूंनासुध्दा समानतेच्या या लढ्यात सहभागी होण्याचे आणि सर्वसहभागासाठी विविधतेला संधी देण्याच्या या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सेरेना व व्हिनस या विल्यम्स भगिनींचा या दृष्टीने चांगला प्रभाव आहे मात्र संतुलन आणण्यासाठी अजूनही बरेच काही करावे लागणार असल्याचे त्याने म्हटले आहे.

चांगला टेनिसपटू बनणे ही काही सोपी गोष्ट नाही. एकतर प्रचंड मेहनत आणि अतिशय कडव्या स्पर्धेचा सामना करायचा असतो आणि दुसरे म्हणजे वर्षाकाठी टेनिसपटूला 1,75,000 ते 20 लाख डॉलरपर्यंत खर्च येत असतो. मात्र आदर्श वाटावीत अशी उदाहरणे समोर असतील तरच इतर कृष्णवर्णी खेळाडूंनाही या खेळाकडे वळावेसे वाटेल. या दृष्टीने विल्यम्स भगिनींचे योगदान फार मोठे आहे. प्रत्येकाला मदत करणे आम्हाला शक्य नसते पण अधिकाधिक लोकांना मदत करण्याचा माझा प्रयत्न असेल, किंबहुना ते माझे कर्तव्यच आहे असे तो म्हणतो.

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णी नागरिकाच्या वादग्रस्त मृत्युसंदर्भात त्याने आपली मैत्रीण अयान ब्रुमफिल्डसोबत वांशिक भेदाविरोधात निषेधाचा एक व्हिडिओ बनवला आहे. त्यातील सहभागावरुनच अमेरिकेत वैविध्याचा किती अभाव आहे ते दिसून आले. इतर कृष्णवर्णी खेळाडू व प्रशिक्षकांसोबत त्याने सेरेना विल्यम्स व कोको गॉफ यांच्यासह त्याने ‘रॅकेटस् डाऊन, हँडस् अप’ हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या व्यक्तींचे चांगले वजन आहे, ज्यांना प्रतिष्ठा आहे, ज्यांना प्रभावशाली व्यासपीठ मिळणे शक्य आहे अशा व्यक्ती अशा विषयांवर बोलल्या तर फरक पडेल आणि काही बदल घडण्याची आशा करता येईल. अमेरिकेत काय चाललेय ते तुम्ही सर्व बघतच आहात.त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येण्याची आणि आवाज उठविण्याची गरज आहे असे त्याने म्हटले आहे.

अमेरिकन टेनिस असोसिएशनचे खेळाडू विकास विभागाचे सरव्यवस्थापक मार्टिनृ ब्लॅकमॅन यांनी म्हटलेय की, अधिकाधिक कृष्णवर्णी खेळाडूंनी व्यावसायिकदृष्ट्या या खेळात कॉलेज टेनिसच्या मार्गाने उतरण्याचा प्रयत्न केला पाहीजे. यात मुलभूत प्रशिक्षण महत्त्वाची भूमिका बजावू शकते.,

जॉर्ज फ्लॉइड प्रकरणावरुन सुरु असलेल्या निदर्शनांबाबत टिफोने म्हटलेय की, तो लोकांचा संताप समजू शकतो पण निदर्शकांनी हिंसा टाळायला हवी. आपण सर्व समान आहोत.कुणीही इतरापेक्षा चांगला किंवा खराब नाही. काही लोकं सत्तेचा गैरफायदा घेतात त्यातून प्रश्न निर्माण होतात. प्रत्येक व्यक्ती महत्वाचीच आहे हे आपण समजून घ्यायला हवे असे त्याने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER