एकही धाव न देता चार बळी, रोझमेरीची भन्नाट कामगिरी

Rosemary Mair

चार षटके, चार निर्धाव, शून्य धावा आणि चार बळी…हे गोलंदाजीचे विश्लेषण आश्चर्य वाटायला लावणारे असेच आहे. फार क्वचित वेळा गोलंदाजीचे असे आकडे बघायला मिळतात. गुरुवारी हे गोलंदाजीचे विश्लेषण बघायला मिळाले कारण रोझमेरी मायर नावाची न्यूझीलंडमधील जलद गोलंदाज. या 21 वर्षीय जलद गोलंदाजाने स्थानिक क्रिकेटमध्ये श्रिम्प्टन ट्रॉफी या आंतर जिल्हा स्पर्धेत गुरुवारी ही कामगिरी केली. हॉकस्बे संघातर्फे तारानाकी संघाविरुध्द तिने ही भन्नाट गोलंदाजी केली. तिच्या या गोलंदाजीने तारानाकी संघ अवघ्या 56 धावातच बाद झाला.

या सामन्यात रोझमेरी केवळ गोलंदाजीतच चमकली असे नाही तर तिने 16 चेंडूतच 33 धावा फटकावून फलंदाजीतही योगदान दिले.

रोझमेरीने तारानाकीच्या डावात गोलंदाजीला सुरुवात केली आणि आपल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तिने सलामीची जेस होलार्ड, त्यानंतर एमी विस्नेवस्की यांना त्रिफळाबाद केले.त्यानंतर लागोपाठ तिसऱ्या चेंडूवर तिने जॉर्डन बोल्गर हिला बाद करुन हॕट्ट्रिक पूर्ण केली.पुढल्या चेंडूवर म्हणजे चौथ्या चेंडूवरसुध्दा तिने आणखी एक विकेट मिळवली. केट बॕक्स्टरला तिने त्रिफळाबाद केले. याप्रकारे चार चेंडूत चार बळींचा विक्रम तिने केला आणि विशेष म्हणजे हे चारही बळी तिने इतर कुणाच्याही मदतीशिवाय (त्रिफळा, त्रिफळा, पायचीत व त्रिफळा) मिळवले.

रोझमेरीने यंदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून ती आतापर्यत तीन वन डे आणि तीन टी-20 सामने खेळली आहे.