बीडमध्ये आघाडीच्या चार नगरसेवकांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, शिवसेनेत प्रवेश

NCP in Beed, join Shiv Sena

बीड : राज्याच्या राजकारणात बीड चे नाव सध्या या ना त्या कारणाने चर्चेत येत आहे. असे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) प्रकरणानंतर आता बीडमधील राष्ट्रवादीच्या आमदाराच्या आघाडीच्या गोटातून राष्ट्रवादीसाठी निराशाजनक बातमी आहे. बीडमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत ज्या शिलेदारांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना आमदार केले, त्याच शिलेदारांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी एका नगरसेवकाने प्रवेश केल्यानंतर आज परत चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

या नगरसेवकांचे म्हणणे आहे की, विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झाल्यानंतरही बीड शहराचा आणि मतदारसंघाचा विकास केवळ बोलण्या पुरताच राहिला आहे. तसेच, आघाडी सत्तेत येऊन एक वर्षही झाले नाही अशा स्थितीत मुख्य शिलेदारांना सापत्न वागणूक मिळू लागल्यामुळे आघाडीच्या चार नगरसेवकांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब गुंजाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केलाहोता, त्यानंतर आज नगरसेवक गणेश तांदळे, प्रभाकर पोपळे, रणजित बनसोडे, भैय्यासाहेब मोरे यांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

आमदाराला लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी याच शिलेदारांनी दिली. परंतु पदावर गेल्यानंतर चारही नगरसेवकांना सापत्न वागणूक मिळू लागली असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सन्मानाची वागणूक आणि कार्यकर्त्यांची भावना जपणारे नेतृत्व म्हणून जयदत्त क्षीरसागर आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते हा विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला. या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे आघाडीत आघाडी फुटली असून, आघाडीच्या 20 नगरसेवकांपैकी 8 नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी दिलीय, तर आणखीही काही जण नाराज असल्याचेही सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER