‘सीएए’च्या समर्थनात गोव्यातील काँग्रेसच्या चार नेत्यांचा राजीनामा

Congress Flag

पणजी : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत (एनआरसी) पक्षाने घेतलेल्या भूमिकेच्या निषेधात गोव्यातील काँग्रेसच्या चार नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. पणजी काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष प्रसाद आमोणकर, उत्तर गोवा अल्पसंख्य विभागाचे प्रमुख जावेद शेख, गट समिती सचिव दिनेश कुबल आणि माजी युवा नेते शिवराज तारकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

पाकव्याप्त काश्मीरसाठी लष्कराला फक्त आदेशाची गरज – लष्करप्रमुख नरवणे

या नेत्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा घोषित केला आहे. संशोधित नागरिकत्व कायद्याबाबत काँग्रेस जनतेची विशेषत: अल्पसंख्याकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आमोणकर यांनी केला. ते म्हणाले, विरोधी पक्ष म्हणून टीका करणे आमचे काम आहे. मात्र केवळ विरोध करणे योग्य नाही.

राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काँग्रेसने जनतेची दिशाभूल करणे आणि अल्पसंख्याकांच्या मनात भीती निर्माण करणे थांबवावे. गोवा भाजपाचे प्रमुख विनय तेंडुलकर यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) विरोध करणाऱ्या पक्षांची तुलना शहरी नक्षलवाद्यांशी केली आहे. नव्या कायद्यावर टीका करणारे पक्ष केवळ विरोधासाठी विरोध करीत असल्याची टीका तेंडुलकर यांनी काँग्रेस आणि अन्य पक्षांवर केली आहे. अमेरिका आणि ब्रिटन यासारख्या देशातील लोक सीएएच्या समर्थनार्थ सरसावले आहेत, मात्र भारतात शहरी नक्षलवादाप्रमाणे काँग्रेस, तृणमूल, सपा आणि बसपा यासह काही पक्ष या कायद्याला केवळ विरोधासाठी विरोध करीत आहेत, असे तेंडुलकर यांनी म्हटले आहे.