वर्ध्यात पुरात वाहून गेल्याने आजोबा आणि नातवासह चौघांचा मृत्यू

four-died-in-wardha-flood-with-grandfather-and-his-grand-child

वर्धा : वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, पुरात वाहून गेल्याने चौघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात दोन महिला, बारा वर्षीय मुलगा आणि त्याचे आजोबा वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यातील एक घटना सोनेगाव (आष्टी) येथे शुक्रवारी (३ जुलै) रात्री उघडकीस आली. तर, दुसरी घटना गोजी येथे शनिवारी (४ जुलै) सकाळी उघडकीस आली.

चारही मृतदेहांची ओळख पटली आहे. सोनेगाव (स्टेशन) शिवारात काही महिला आणि पुरुष शेतात गेले होते. दरम्यान, जोरदार पाऊस आल्याने कामे आटोपून घरी जात असताना ते बैलगाडीच्या साहाय्याने नाला पार करत होते. यावेळी दोन महिला बैलगाडीला पकडून नाला पार करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, अचानक बैल फसल्याने बैलगाडी थांबली आणि पाण्याच्या प्रवाहात दोन्ही महिला वाहून गेल्या.

यावेळी इतरांनी धडपड करत कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. महिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली असता दोघींचेही मृतदेह उशिरा नाल्याच्या पुढील भागात आढळून आले. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह सेवाग्राम येथे आणण्यात आले. चंद्रकला लोटे आणि बेबी भोयर अशी मृत महिलांची नावे आहेत.

दुसरी घटना ही गोजी शिवारातील येरणगाव गोजी मार्गावरील नाल्यात घडली. धोत्रा येथून आजोबा आणि नातू बैलगाडी नेऊन देण्यासाठी सावली (सास्ताबाद) येथे जात होते. पण, पुलावर असलेल्या पाण्यात बैलगाडीसह आजोबा आणि नातू दोघेही वाहून गेले. सुरुवातीला १२ वर्षीय मंगेशचा आणि नंतर आजोबांचा मृतदेह आढळून आला. नारायण पोहाणे असं या आजोबाचं नाव आहे. मंगेश हा त्यांच्या मुलीचा मुलगा होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER