‘अटल बोगद्या’जवळचा सोनिया गांधी यांच्या नावाचा फलक पुन्हा लावा

- काँग्रेसची मागणी

foundation-stone-laid-by-sonia-gandhi-at-atal-tunnel-goes-missing.jpg

शिमला : रोहतांग पास येथे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी नुकतेच अटल बोगद्याचे उद्घाटन केले. या ठिकाणी काँग्रेस (Congress) अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नावाचाही एक फलक होता. तो गायब झाला. यांच्याविरोधात काँग्रेसने हिमाचलप्रदेशात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ ऑक्टोबर रोजी ‘अटल बोगदा’ राष्ट्राला समर्पित केला आहे.

काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राजवटीत २०१० साली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते ‘अटल बोगद्या’च्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. ३ ऑक्टोबरच्या उद्घाटन कार्यक्रमाआधी सोनिया गांधी यांचे नाव असलेला हा फलक हटवण्यात आला, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुलदीप सिंह राठोड यांनी केला आहे.

राठोड यांनी याबद्दल सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध केला आहे. “पायाभरणी कार्यक्रमाच्यावेळचा फलक सरकारने १५ दिवसांत पुन्हा बसवला नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडू.” असा इशारा राठोड यांनी दिला. २८ जून २०१० रोजी सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेते वीरभद्र सिंह आणि माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्या उपस्थितीत अटल बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन केले होते, अशी माहिती कुलदीप सिंह राठोड यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER