सौरव गांगुलीच्या हृदयविकाराच्या झटक्याने ‘फॉर्च्यून’च्या जाहिरातीचे मरण

कोलकाता :  मागील आठवड्यात भारताचा माजी कर्णधार व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर ‘फॉर्च्यून राईस बॅन कुकिंग ऑईल’ तेलाच्या जाहिराती अदानी विल्मारने मागे घेतल्या आहेत; करण, “हे तेल तुमची प्रतिकारशक्ती वाढवते.” अशी या जाहिरातीची टॅगलाईन होती. आणि ही जाहिरात सौरव करत होता.

 कोलकातातील वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये (Woodlands Hospital) सौरववर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याची प्रकृती सुधारली असून बुधवारी त्याला डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, गांगुली आजारी पडल्यानंतर तो जाहिरात करत असलेल्या फॉर्च्यूनच्या (Fortune Rice Bran cooking oil)  सर्व जाहिराती मागे घेण्यात आल्याचे अदानी विल्मारने जाहीर केले.

या जाहिराती मागे घेण्याच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली व फॉर्च्यूनला ट्रोल करण्यात आले. प्रसिद्ध सर्जन डॉ. देवी शेट्टी यांनी मंगळवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन गांगुलीच्या प्रकृतीची पाहणी केली. अनेक भारतीयांना झटका देणारा हृदयासंदर्भात आढळणारा आजार गांगुलीला झाला आहे; पण त्यामुळे त्याच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही. त्याच्यावर अँजिओप्लास्टीची गरज आहे. औषध व काळजी घेतल्यानंतर तो पुन्हा पूर्वीसारखा कामकाज करू शकतो. पुढील दोन आठवड्यांत त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येतील, असे शेट्टी यांनी सांगितले.

गांगुलीवर उपचार करण्यासाठी १३ वैद्यकीय सदस्यांची टीम काम करत होती. त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. दरम्यान, माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनीही फॉर्च्युनच्या जाहिरातीवरून गांगुलीला टोमणा मारला आणि प्रकृती सुधारण्याच्या शुभेच्छाही दिल्या. प्रकृती सुधारण्याच्या शुभेच्छा देतानाही टोमणा मारण्यासाठी आझाद ट्रोल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER