कोल्हापुरात दुर्ग परिषद : खा. संभाजीराजे यांचा उपक्रम

Sambhaji Raje

कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता मेन राजाराम कॉलेज, भवानी मंडप येथे ऐतिहासिक दुर्ग परिषदेचे आयोजन केले आहे. याअंतर्गत राज्यभरातील ३५० हून अधिक किल्ल्यांबाबत चर्चा करण्यात येणार असून यामध्ये दुर्ग संवर्धनाशी निगडित २२५ संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. अशी माहिती संयोजन समितीचे सुखदेव गिरी यांनी दिली.; यावेळी फत्तेसिंह सावंत, राम यादव, हेमंत साळोखे, संजय पवार, विनायक फाळके, धनंजय जाधव, योगेश केदार उपस्थित होते.

समितीच्या वतीने दोन वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर घेतलेल्या दुर्ग परिषदेत पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग आणि वनविभागासह दुर्ग संवर्धन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या परिषेदनंतर राज्यात दुर्ग संवर्धनाच्या चळवळीला वेग आला होता. किल्ले रायगडनंतर होणाऱ्या या परिषदेत दुर्ग अभ्यासकांनी केलेले काम, विविध माहितीचे संकलन, दुर्लक्षित गडांबाबतची माहिती आदींबाबत उहापोह होणार आहे. दुर्ग संवर्धनाबाबत महत्त्वाचे निर्णय होणार असून खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीत महत्त्वाचे ठरावही केले जाणार आहेत. शहराजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

दुर्ग परिषदेदरम्यान संयोगीताराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून राज्यातील विविध प्रकारच्या जलदुर्ग, भुईकोट किल्ले, वनदुर्ग यांची माहिती एकत्रित करून ती मोबाईल ॲपद्वारे डिजिटल पद्धतीने संकलित केली जाणार आहे. त्यासाठी उपस्थित प्रत्येक दुर्ग अभ्यासकांकडून माहिती गोळा केली जाणार असल्याचेही समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER