आधी पूजा चव्हाण आता समीर गायकवाड टिकटॉक स्टारची पुण्यात आत्महत्या

Sameer Gaikwad

पुणे :- युट्युब, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय असलेला टिकटॉक स्टार समीर गायकवाड (Sameer Gaikwad) याने रविवारी सायंकाळी पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. टिकटॉक स्टार पूजा चव्हाणने (Pooja Chavan) पुण्यातच आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना हा दुसरा धक्का बसला आहे.

समीर हा एक देखणा तरुण होता. वयाच्या केवळ 22 व्या वर्षी त्याने सोशल मीडियात लाखो फॉलोअर्स मिळवले होते. त्याचे टिकटॉक व्हिडिओ आणि इंस्टाग्रामवरील रील तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येसंदर्भात वन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आले आहे.  त्यांच्या कथित आवाजातील  ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. संजय राठोड मंगळवारी जनतेसमोर येऊन बाजू मांडणार आहेत.त्याच वेळी समीर गायकवाडने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची बाब समोर येत आहे. त्याच्या आत्महत्येमागील प्रेमप्रकरण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आपल्या टिकटॉक व्हिडिओंमधून समीर नेहमीच जगण्याची नवीन उमेद द्यायचा,जीवनाचे तत्त्वज्ञान सांगायचा, माणुसकी कशी जपावी ते बोलायचा. अशा तरुणाने आत्महत्या का करावी असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. गळफास घेण्यापूर्वी त्याने कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे गूढ अधिकच वाढले आहे.

वाघोली पुणे येथे राहत्या घरी त्याने साडीने गळफास घेतला. समीर याचा भाऊ प्रफुल्ल रोहिदास गायकवाड यांनी  लोणीकंद पोलिसांना माहिती दिली. समीर याने गळफास घेतल्याचे समजल्यावर त्याला खाली उतरुन लाईफलाईन हॉस्पिटलला तातडीने नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

म्युझिक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून समीर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. तो पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.समीर हा ब्लॉगर म्हणून तरुणाईमध्ये लोकप्रिय होता. त्याचे रेडलाईट डायरीज ही ब्लॉगवरील मालिका चांगलीच गाजली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER