कोळसा घोटाळ्यात माजी केंद्रीय मंत्री दिलीप राय यांना तुरुंगवास

खाणपट्टा वाटपातील २१ वर्षांपूर्वीचा भ्रष्टाचार

Dilip Rai jailed in coal scam

नवी दिल्ली :- झारखंडच्या गिरीडिह जिल्ह्यातील एका कोळसा खाणपट्ट्याचे २१ वषार्पूर्वी भ्रष्टाचार, लबाडी व गुन्हेगारी स्वरूपाचा कट करून वाटप केल्याबद्दल कोळसा खात्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप राय (Dilip Rai) यांच्यासह चार आरोपींना सोमवारी प्रत्येकी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

‘सीबीआय‘ (CBI)ने दाखल केलेल्या भ्रष्टाचार खटल्यांसाठीच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांनी हा निकाल दिला. त्यानुसार दिलीप राय यांच्याखंरीज केंद्रीय कोळसा खात्याचे तत्कालिन अतिरिक्त सचिव प्रदीप कुमार बॅनर्जी, त्याच खात्यातील एक तत्कालिन सल्लागार नित्यानंद गौतम, अनुक्रमे धनबाद व कोलकाता येथील मे. कॅस्ट्रन टेक्नॉलॉजिस व मे. कॅस्ट्रन मायनिंग या दोन कंपन्यांचे संचालक महेंद्र कुमार अगरवाल यांनाही तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली.

याखेरीज या चारही आरोपींना प्रत्येकी १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. दोन आरोपी कंपन्यांना अनुक्रमे ६० लाख रुपये व १० लाख रुपयांचा दंड झाला. हा कोळसाखाण घोटाळा झाला तेव्हा दिलीप राय अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते तर अगरवाला संसद सदस्य होते.

गिरीडिह येथील या खाणपट्ट्याचे वाटप ऑगस्ट १९९९मध्ये केले गेले होते. त्यानसार ८० वर्षांपूर्वी खाणकाम बंद झालेला हा १०५ हेक्टरचा कोळसा खाणपट्टा आधी अगरवाला यांच्या  मे. कॅस्ट्रन टेक्नॉलॉजीस कंपनीस दिला गेला व नंतर त्याचे कॅस्ट्रन मायनिंग कंपनीस हस्तांतरण केले गेले.

हा खाणपट्टा वाटप करण्याच्या यादीत नव्हता व अगरवाला यांच्या कंपन्या तो मिळविण्यासाठी पात्र नव्हत्या. तरी राय व अगरवाला यांनी आपल्या पदांचा दुरुपयोग करून आणि नियम बाजूला ठेवून हा निर्णय करविला, असा या खटल्यातील मुख्य आरोप होता. केंद्रीय दक्षता आयोगाने त्या काळातील अनेक कोळसा खाणपट्टे वाटपाची छाननी केली. त्यापैकी ज्यात गैरप्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी वाटले अशी प्रकरणे तपासासाठी ह्यसीबीआयह्णकडे दिली गेली. त्यापैकीच हे एक प्रकरण.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER