झारखंड कोळसा खाण घोटाळ्यात माजी केंद्रीय मंत्री दिलीप राय दोषी

भ्रष्टाचाराने खाणपट्ट्याचे वाटप केल्याचे सिद्ध

Dilip Ray

नवी दिल्ली : झारखंडच्या गिरिडिह जिल्ह्यातील एका कोळसा खाणपट्ट्याचे २१ वर्षांपूर्वी केले गेलेले वाटप भ्रष्टाचार, लबाडी व गुन्हेगारी स्वरूपाचा कट करून केले गेल्याचे नि:संशयपणे सिद्ध झाल्याने त्या वेळचे केंद्रीय कोळसा राज्यमंत्री दिलीप राय (Dilip Ray) यांच्यासह सहा आरोपींना  मंगळवारी दोषी ठरविले गेले.

‘सीबीआय’ने दाखल केलेल्या भ्रष्टाचार खटल्यांसाठीच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांनी गेल्या मार्चमध्ये राखून ठेवलेला हा निकाल मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जाहीर केला. या निकालानुसार जे आरोपी  दोषी ठरले आहेत त्यात दिलीप राय यांच्याखेरीज केंद्रीय कोळसा खात्याचे तत्कालीन अतिरिक्त सचिव  प्रदीपकुमार बॅनर्जी, त्याच खात्यातील एक तत्कालीन सल्लागार नित्यानंद गौतम, अनुक्रमे धनबाद व कोलकाता येथील मे. कॅस्ट्रन टेक्नॉलॉजिस व मे. कॅस्ट्रन मायनिंग या दोन कंपन्या तसेच या दोन्ही कंपन्यांचे संचालक महेंद्रकुमार अगरवाला यांचा समावेश आहे. त्यावेळी अगरवाला संसद सदस्यही होते. दोषी ठरलेल्या आरोपींना येत्या १४ ऑक्टोबर रोजी शिक्षा सुनावली जाईल. सध्या जामिनावर असलेल्या आरोपींना त्या दिवशी न्यायालयापुढे हजर राहावे लागेल.

अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर असताना ऑगस्ट १९९९मध्ये खाणपट्ट्याचे हे वाटप केले गेले होते. त्यानुसार ८० वर्षांपूर्वी खाणकाम बंद झालेला गिरिडिह जिल्ह्यातील १०५ हेक्टरचा कोळसा खाणपट्टा अगरवाला यांच्या कंपनीस दिला गेला. आधी तो मे. कॅस्ट्रन टेक्नॉलॉजीस कंपनीस दिला गेला व नंतर त्याचे कॅस्ट्रन मायनिंग कंपनीस हस्तांतरण केले गेले. हा खाणपट्टा वाटप करण्याच्या यादीत नव्हता व अगरवाला यांच्या कंपन्या तो मिळविण्यासाठी पात्र नव्हत्या.

तरी राय व अगरवाला यांनी आपल्या पदांचा दुरुपयोग करून आणि नियम बाजूला ठेवून हा निर्णय करविला, असा या खटल्यातील मुख्य आरोप होता. केंद्रीय दक्षता आयोगाने त्या काळातील अनेक कोळसा खाणपट्टे वाटपाची छाननी केली. त्यापैकी ज्यात गैरप्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी वाटले अशी प्रकरणे तपासासाठी ‘सीबीआय’कडे दिली गेली. त्यापैकीच हे एक प्रकरण.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER