काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचं दीर्घ आजाराने निधन

Sardar Buta Singh

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग (Sardar Buta Singh) यांचे आज शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बुटा सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री आदी पदे भूषवितानाच बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपदही सांभाळले होते.

बुटा सिंग गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. मात्र आज शनिवारी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 21 मार्च 1934 मध्ये पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील मुस्तफापूर गावात बुटा सिंग यांचा जन्म झाला होता. ते 8 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. बुटा सिंग हे माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बुटा सिंग काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाची खाती सांभाळली. राष्ट्रीय राजकारणात सक्रीय राहतानाच दलितांचे नेते म्हणूनही त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली होती. ते 1978 ते 1980 या काळात काँग्रेसचे महासचिव होते. यानंतर ते भारताचे गृहमंत्री झाले. मात्र, डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार येताच त्यांना बिहारचे राज्यपाल करण्यात आले होते.

बुटा सिंग यांच्या निधनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सरदार बुटा सिंग यांच्या निधनाने प्रामाणिक जनसेवक आणि निष्ठावान काँग्रेसी नेता गमावला आहे. देश आणि जनतेच्या सेवेसाठी त्यानी संपूर्ण जीवन आर्पित केलं होतं. त्यांचं हे योगदान कायम स्मरणात राहिल, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER