माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांचे निधन, मोदींसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

jaswant-singh-

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे जसवंत सिंह यांनी देशाची कायम सेवा केली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत मोदींनी ट्वटिमध्ये म्हटले की, जसवंत सिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, जसवंत सिंह हे त्यांच्या बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांनी राजस्थानमध्ये भाजपाला बळकट करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या परिवार व समर्थकांच्या बरोबर आहे.

जसवंत सिंहाचा जन्म ३ जानेवारी १९३८ मध्ये राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील जसोल गावात झाला होता. त्यांचा मोठा मुलगा मानवेंद्र सिंह बाडमेरमध्ये माजी खासदार राहिले आहेत. जसवंत सिंहाच्या राजकारणातील कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास ६० च्या दशकात ते राजकारणात आले. भाजपचे मोठे नेता आणि माजी उपराष्ट्रपती भैरव सिंह शेखावत यांना जसवंत सिंहाचा गुरु मानले जाते. ते १६ मे १९९६ ते १ जून १९९६ पर्यंत देशाचे अर्थमंत्री राहिले. यावेळी अटल बिहारी वाजपेयी अवघ्या १३ दिवसांसाठी देशाचे पंतप्रधान झाले होते. दोन वर्षांनंतर जेव्हा वाजपेयी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्यावर परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर २००२ मध्ये त्यांना अर्थमंत्रीपद देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER