शेतक-यांनी निराश न होता हाक द्या, शिवसेना तुमच्या मदतीला धावून येईल : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray

सोलापूर :- ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थिती व शेतीची बिकट अवस्था लक्षात घेता शेतक-यांनी निराश होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. असा प्रसंग आल्याचे शिवसेनेला हाक द्या. शिवसेना तुमच्या मदतीला धावून येईल, अशी ग्वाही शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिली.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्य़ात मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे आष्टी उपसा सिंचन योजनेच्यचा दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन पार पडले. याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात शेकडो शेतक ऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून गेली २५ वर्षे रखडलेले आष्टी उपसा सिंचन योजना मार्गी लागत असल्याबद्दल सर्वानी समाधान व्यक्त केले.

आदित्य म्हणाले, सोलापुर जिल्ह्यात दुष्काळाचे संकट ओढावल्यानंतर मागील 12 फेब्रुवारी रोजी आपण येथे शेतक-यांना मदत करण्यासाठी आलो होतो. त्यावेळी शिवसैनिकांच्या माध्यमांतून गठित कृती संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन आष्टी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी निवेदनही दिले होते.

दुष्काळी भागात शेतीला पाणी देण्यासाठी महत्वाकांक्षी कार्यक्रम 1995-97 या काळात युती सरकारने कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून दुष्काळी भागात शेतीला पाणी देण्याच्या महत्वाकांक्षी कार्य हाती घेतला होता. त्या अंतर्गत मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनाही मंजूर करण्यात आली होती. मात्र योजनेचे काम सुरु झाल्यानंतर सत्तांतर झाले आणि गेली 25 वर्षे ही योजना रखडली.