झुंज संपली : शिवसेनेच्या ‘या’ माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन

Suresh Gore.jpg

पुणे : शिवसेनेचे (Shivsena) खेड-आळंदी विधानसभेचे माजी व प्रथम आमदार सुरेश गोरे (वय ५७) यांचे आज सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली.

सुरेश गोरे (Suresh Gore) यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर मागील २० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, या लढाईत आज त्यांना अपयश आले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या गोरे यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही भूषवले होते. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले होते. राजकीय गणिताच्या समीकरणात सुरेश गोरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी ३० हजारांवर मतांनी गोरे यांनी दिलीप मोहिते पाटील यांचावर मात केली होती. त्यांच्या रूपाने खेड तालुक्याच्या इतिहासात शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची नोंद झाली.

सुरेश गोरे यांच्यामागे, आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊबहीण, चुलते, पुतणे असा मोठा आणि एकत्रित कुटुंब असलेला मोठा परिवार आहे. सेनेच्या सर्वच नेत्यांमध्ये गोरे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER