स्टेट बँकेच्या माजी अध्यक्षांच्या परदेश प्रवासावरील निर्बंध रद्द

Mumbai High Court-OM Prakash Bhatt

‘सीबीआय’ची कारवाई हायकोर्टाने बेकायदा ठरविली

मुंबई :- स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) माजी अध्यक्ष ओम प्रकाश भट्ट (Om Prakash Bhatt) यांच्या परदेश प्रवासावर निर्बंध लादण्यासाठी केंद्रीय गुप्तचर विभागाने (CBI) त्यांच्याविरुद्ध ४ सप्टेंबर, २०१८ रोजी जारी केलेले ‘लूक आऊट सर्क्युलर’ (Look Out Circular-LOC) मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केले आहे.

स्टेट बँकेसह अनेक बँकांकडून ‘किंगफिशर एअरलाइन्स’च्या नावाने घेतलेली हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडवून भारतातून परागंदा झालेल्या ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या यास स्टेट बँकेने कर्ज दिले तेव्हा भट्ट त्या बँकेचे अध्यक्ष होते व त्या कर्ज व्यवहारात त्यांची महत्वाची भूमिका होती, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ते ‘लूक आऊट सर्क्युलर’ जारी करण्यात आले आहे, असे सांगून ‘सीबीआय’ने त्याचे समर्थन केले होते.

भट्ट यांनी केलेली याचिका मंजूर करून न्या. संभाजी शिवाजी शिंदे व  न्या मनिष पितळे यांच्या खंडपीठाने म्हटले की, भट्ट यांच्याविरुद्ध असे ‘लूक आऊच सर्क्युलर’ जारी करण्यास ‘सीबीआय’कडे कोणतेही सबळ कारण नाही. ‘किंगफिशर’ कंपनीच्या कर्ज प्रकरणात भट्ट हे आरोपी किंवा संशयितही नसताना त्यांच्या परदेश प्रवासावर असे निर्बंध लादणे तद्दन बेकायदा आहे.

न्यायालयाने म्हटले की, हे ‘लूक आऊट सर्क्युलर’ जारी केल्याची कोणतीही माहिती ‘सीबीआय’ने भट्ट यांना कधीही कळविली नाही. हे ‘सर्क्युलर’ जारी केल्यानंतर त्याच महिन्यात भट्ट परदेशी जाण्याच्या तयारीत असताना त्यांना मुंबई विमानतळावर रोखण्यात आले. पण तेव्हाही त्यांना रोखण्याचे कोणताही कारण सांगण्यात आले नाही. या याचिकेवर ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या उत्तराच्या प्रतिज्ञापत्रातून भट्ट यांना आपल्याविरुद्ध असे ‘लूक आऊट सर्क्युलर’ काढले गेले आहे, हे प्रथम समजले.

न्यायालयाने असेही नमूद केले की, २९ सप्टेंबर, २०१८ रोजी मुंबई विमानतळावर अडविल्यानंतर आत्तापर्यंत भट्ट यांनी किमान १२ वेळा परदेश प्रवास केला आहे. परंतु या नंतरच्या प्रवासाच्या वेळी त्यांना एकदाही अडविले गेले नाही. तसेच ‘किंगफिशर’ कर्जघोटाळ््याच्या संदर्भात चौकशीसाठी त्यांना सन २०१८ मध्ये फक्त एकदा दिल्लीला बोलावले गेले. त्यावेळी त्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक नव्हती असे ‘सीबीआय’ म्हणते पण त्यानंतर त्यांना चौकशीसाठी कधीही बोलावले गेलेले नाही.

न्यायालयाने भट्ट यांच्याविरुद्धचे ‘लूक आऊट सर्क्युलर’ रद्द केले तरी यापुढे परदेशी जाण्याआधी व परत आल्यावर प्रत्येक वेळी भट्ट यांनी ‘सीबीआय’ला माहिती द्यावी, असे न्यायालयाने सांगितले.

‘स्टेट बँकेतून निवृत्त झाल्यानंतर भट्ट अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व सॅण्डर्ड चार्टर्ड बँकेसारख्या काही अग्रगण्य बँकांचे संचालक आहेत.

या सुनावणीत भट्ट यांच्यासाठी ज्येष्ठ वकील प्रसाद ढाकेफळकर यांनी तर ‘सीबीआय’साठी अ‍ॅड. एच. एस. वेणेगावकर यांनी काम पाहिले.

ही बातमी पण वाचा : ‘पॉक्सो’ गुन्ह्याची शिक्षा तहकूब करून वृद्ध दाम्पत्याला दिला जामीन

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button